मुंबई :  एकीकडे गर्भवती महिलेला दाखल करून न घेतल्याने तिचा मृत्यू झाल्याची ठाण्यातील घटना ताजी असतानाच कल्याण शहरात मात्र बरोबर याच्या उलट प्रकार घडला आहे. आपल्या आईच्या मृत्यूपेक्षाही डॉक्टरने आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत अडचणीत असलेल्या गर्भवती महिलेची सुखरूप प्रसूती केल्याचा सकारात्मक प्रकार समोर आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणमधील गर्भवती महिला शबा शेख ही प्रसूतीसाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात गेली होती. परंतु त्याठिकाणी आयसीयु नसल्याने तिला कळव्यातील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानूसार या महिलेला कुटुंबियांनी कळवा रुग्णालयात नेले. मात्र त्याठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून दुसऱ्या दिवशी तिला सोडून देण्यात आले. हा सर्व प्रकार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना समजताच त्यांनी तातडीने कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधून या महिलेची प्रसूती करण्याची विनंती केली.


त्यावर डॉ.यांनीही तातडीने प्रतिसाद देत आयएमएकडून या महिलेची निःशुल्क प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार या महिलेला कल्याणातील वैष्णवी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी तिची प्रसूती होत असतानाच मुख्य डॉक्टर अश्विन कक्कर यांच्या मातोश्री मधूलिका कक्कर यांचे निधन झाले. मात्र स्वतःवर कोसळलेले एवढे मोठे दुःख बाजूला ठेवत डॉ. अश्विन कक्कर यांनी आपल्या कर्तव्याला प्रथम प्राधान्य देत या महिलेची सुखरूप प्रसूती केली आणि त्यानंतर आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले. 



एकीकडे जन्मदात्रीचा झालेल्या मृत्यू तर दुसरीकडे नव्या बाळाला जन्म देणारी ती अनोळखी माता. अशा कसोटीच्या काळातही डॉक्टर अश्विनयांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेचे करावे तेवढे कौतुक कमीच राहील. डॉक्टरांनी आताच्या परिस्थितीचा आणि आपल्या कर्तव्याचा विचार करून महिलेच्या प्रसुतीला पहिलं प्राधान्य दिलं.