मुंबई : गेल्या ४२ वर्षांपासून विविध चलचित्रांद्वारे भाविकांना संदेश देणाऱ्या अंधेरीतल्या बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचेयंदाचे ४३ वे वर्ष. अंधेरीतल्या अनेक चाळींनी एकत्र यावे, त्यांच्यात एकोपा वाढावा या उद्देशाने १९७४ साली बालगोपाळ मित्र मंडळाची स्थापना केली. श्री. मधुकर जांभळे,  श्री. सुरेश भवानगीर, श्री. प्रेमनाथ वराडकर, श्रीमती. पुष्पलता जांभळे या जागरुक स्थानिकांनी एकत्र येत अंधेरीत सार्वजानिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे प्रकाशवाडी, गोविंदवाडी, एन.एम.टी कम्पाऊंड एकत्र आले. त्यांच्यातील एकोपा वृद्धिंगत झाला. या बाप्पाने स्थानिकांचे अनेक विघ्न दूर केले आहेत. त्यामुळे या बाप्पाला "अंधेरीचा विघ्नहर्ता" म्हणून ख्यातीही मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजात एकोपा निर्माण व्हावा, एकमेकांचे विचार आपसात कळावे, सामाजिक बांधिलकी जपली जावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वाजानिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. त्यांच्या या उद्देशाचे पालन व्हावे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावे याकरताच बालगोपाळ मित्र मंडळाची स्थापना झाली. आकर्षक मंडप, विलोभनीय सजावट यामुळे हा बालगोपाळ गणेशोत्सव मंडळातला बाप्पा नेहमीच प्रत्येक भाविकांचं आकर्षण ठरतो. कालांतराने यामध्ये अनेक तरुणांनी सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नाने सजावटीचं रुपांतर चलचित्रामध्ये झालं. विविध विषय घेऊन तरुण चलचित्रात आपली कला दाखवू लागले. त्यांच्या या उपक्रमालाही भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. दरवर्षी नवं काहीतरी पहायला मिळेल या उद्देशाने भाविक आवर्जुन उपस्थित राहतात. दिवसेंदिवस या मंडळाची ख्याती वाढत गेली आणि भाविकांनीच या बाप्पाला अंधेरीचा विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्धीस आणले.
 
दादरच्या एका कारखान्यातून या बाप्पाची मूर्ती येते. दादरहून अंधेरीला बाप्पाची एवढी मोठी भव्य मूर्ती आणणं जरा आव्हानच असतं, असं मंडळाचे सदस्य सांगतात. मात्र या मंडळाचे अध्यक्ष विक्रम सिंग, नरेंद्र रावलीकर, विनयवराडकर, सनी सिंग, जय जाधव, जयेश उपाध्याय, श्री. रोहित नेवरेकर, श्री. राजेश जांभळे, स्व. अजय लालता सिंग या पदाधिकाऱ्यांनी आणि इतर कार्यकर्त्यांनी आगमनाचा तिढा सोडवला. परळ मैदान ते अंधेरी मंडपपर्यंत अगदी थाटामाटात गणपतीचे आगमन होऊ लागले. यामध्ये कोणतेच विघ्न "अंधेरीच्या विघ्नहर्त्या"मुळे आले नाहीत. यादरम्यान मंडळाशी अनेक चांगली माणसे जोडली गेली. त्यामुळे मंडळ अधिक विस्तारीत होत गेले. दरवर्षी बाप्पासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहून सारेच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला आहे. 


सामाजिक भान ठेवून या मंडळाकडून अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात. रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर यांसारखे अनेक उपक्रम या मंडळाने राबवले आहेत. शिवाय गरीब मुलांना आर्थिक मदत करणे, त्यांना शालेयपयोगी वस्तू देणे, शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांना शिक्षणाची गोडी लावणे असे अनेक उपक्रम या मंडळाकडून राबवले जातात.