Mumbai Ganesh Utsav 2024 : घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव समाजाला एकसंध ठेवण्याचं काम करु लागला आणि यातूनच सार्वजनिक (Ganeshotsav 2024) गणेशोत्सवाची सुरुवात झाली. याच सार्वजनिक गणेशोत्सवाचं सुरेख रुप पाहायला मिळालं ते म्हणजे मायानगरी मुंबईच्या (Lalbaug) लालबाग आणि परळ (Parel)भागांमध्ये. शहरातील गिरणगावं गतकाळात गणेशोत्सवादरम्यान वेगळ्याच दिमाखात बहरायची आणि इथं गल्लीबोळातून 'गणपती बाप्पा मोरया'चे सूर कानी पडायचे. आजही हे चित्र बदललेलं नाही, बदललंय ते फक्त उत्सवाचं स्वरुप. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधुनिकतेच्या सोबतीनं साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवामध्ये काही मंडळं आजही त्यांच्या जुन्या ओळखीमुळं आणि मंडळाच्या आदर्शांमुळं चर्चेचा विषय ठरतात. त्यातलंच एक मंडळ म्हणजे लालबागमधील (Ganeshgalli) गणेशगल्लीतील लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. या मंडळाची  कायमच सर्वदूर चर्चा असते, कारण ठरतं ते म्हणजे इथं केली जाणारी सजावट आणि अर्थातच इथं असणारी 'श्रीं'ची मूर्ती.


मुंबई शहरामध्ये आजच्या घडीला अनेक उंच आणि भव्य मूर्ती पाहायला मिळतात. पण, गणरायांच्या या उंच मूर्तींचा खरा पाया रचला गेला तो म्हणजे याच गणेशगल्लीमध्ये. प्रख्यात मूर्तीकार दिनानाथ वेलिंग यांनी मुंबई आणि देशातील सर्वात मोठी आणि उंच अशी गणरायाची मूर्ती 1977 मध्ये साकारली आणि पाहणारा प्रत्येकजण अचंबित झाला. गणेशगल्लीतील गणेशोत्सव मंडळाशी विशेष आपुलकी असणारे वेलिंग त्या काळात कधीच मूर्तीची किंमत सांगत नसत, मानधन स्वरुपात मंडळाकडून दिली जाणारी फुल न फुलाची पाकळी त्यांच्यासाठी लाखामोलाची होती. 


आपल्याला असं काम करायचं आहे की सर्वांनीच त्या कामाचं कौतुक करावं अशा महत्त्वाकांक्षेच्या बळावर दिनानाथ वेलिंग यांनी 1977 मध्ये कमळावर विराजमान अशी गणरायाची मूर्ती साकारण्याचं शिवधनुष्य पेललं आणि पाहता पाहता ही महाकाय मूर्ती उभी राहिली. गणेशोत्सवापासून कैक दिवस आधीच वेलिंग यांनी त्यासाठीची तयारी सुरू केली होती. मूर्तीसाठीची ट्रॉली तयार करण्यापासून ते अगदी मूर्ती विसर्जनासाठी निघणार तेव्हा घेतली जाणारी काळजी या साऱ्याचा विचार करत वेलिंग यांनी आराखडा तयार केला आणि आपल्या कलेत स्वत:ला झोकून दिलं. 


हेसुद्धा वाचा : गणपती बाप्पाच्या नावापुढे 'मोरया' का म्हटलं जातं? याचा अर्थ माहितीये?


 


मूर्ती तयार झाली आणि गणरायाचं हे रुप मंडपात आणि विसर्जनासाठी निघाल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या गर्दीचं लक्ष वेधताना दिसलं. गणरायाचा महाकाय हात जणू आपल्यालाच आशीर्वाद देत आहे असंच प्रत्येकाला वाटलं. खरी परीक्षा तर तिथं होती, जेव्हा मूर्ती विसर्जन मार्गावर असताना चिंचपोकळीच्या पुलावरून निघाली. इथं वेलिंग यांच्या कलेची खरी परीक्षा होती. पण, कमालीची पूर्वतयारी आणि दूरदृष्टीच्या बळावर ही परीक्षाही ते उत्तीर्ण झाले. विसर्जन सोहळ्याच्या वेळी खुद्द वेलिंग या पुलावर गर्दीत एका बाजुला उभे राहून हे सारं पाहत होते आणि ज्या क्षणी मूर्तीनं पूल ओलांडला त्या क्षणी त्यांच्याही डोळ्यात आनंदाश्रू तरळले... असं मंडळातील माजी सभासदांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं. 



कै. 'मास्तर' दिनानाथ वेलिंग हे नाव मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या वर्तुळात कायमच आदरानं घेतलं जातं. या नावाभोवती असणारं वलय म्हणजे बाप्पाचाच आशीर्वाद असंही म्हटलं जातं. या मूर्तीकाराच्या सन्मानार्थ आणि त्यांनी मंडळाप्रती दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ गणेशगल्लीमध्ये आजही वेलिंग यांच्या नावे प्रवेशद्वाराची उभारणी करत त्यांच्या कलेपुढे सारेच नतमस्तक होताना दिसतात आणि म्हणतात, ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची....