ऋचा वझे, झी 24 तास मुंबई  : लालबागच्या राजा मंडपात विराजमान झालाय. मात्र प्रतिष्ठापनेपूर्वीच  लालबागच्या मंडळाला पोलिस आणि स्थानिकांच्या वादाचं गालबोट लागलं. त्यामुळे राजाच्या ऑनलाईन दर्शनासाठी भाविकांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर नव्या नियमावलीनंतर हा वाद संपला. (ganeshotsav 2021 new guidelines for lalbaugcha raja ganesh mandal after clashes police and local traders)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबागचा राजा म्हणजे शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान. मात्र यंदा भाविकांना घरातूनच राजाचं दर्शन घ्यावं लागणार आहे. खरं तर सकाळी 10.30 वाजता गणेशमूर्तीची विधीवत पूजा सुरू होणं अपेक्षित होतं. त्यानंतर 11 वाजता लालबागच्या राजाचं ऑनलाईन दर्शन सुरू केलं जाणार होतं. मात्र मुंबई पोलीस आणि लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तासाभर चर्चा झाली. परिणामी पूजेला विलंब झाला. 


स्थानिक व्यापाऱ्यांनी मिळून लालबागच्या राजाची स्थापने केली. याच व्यापारी मंडळीला पोलिसांनी नोटीस पाठवून दुकानं बंद केली. यावरुन पोलिस आणि स्थानिकांसह व्यापारी आमनेसामने आले. मात्र यानंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली. यानंतर या सर्व प्रकरणाला पूर्णविराम मिळालं. 


लालबागचा राजा मंडळासाठी नियमावली


या नव्या नियमानुसार लालबागच्या राजाचं यंदा प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाही. मात्र भाविकांसाठी 24 तास ऑनलाईन दर्शनाची सुविधा असणार आहे. आरतीच्या वेळी फक्त 10 जणांनाच परवानगी देण्यात आलीय. तर लालबागमधील प्रत्येक दुकानात दोघांनाच परवानगी असेल. तसेच कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास कडक कारवाईही केली जाणार आहे. 


पोलिस आणि स्थानिकांमधला वाद मिटला असला तरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाल्यानं भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. ज्या राजामुळे मंडळ नावारूपाला आलं, त्याच्या आगमनावेळी तरी वादाचं गालबोट नको, अशीच भावना गणेशभक्तांमधून व्यक्त होतेय.