`एक प्रभाग- एक गणपतीला` गणेशोत्सव समन्वय समितीचा विरोध
मंडळांनी या बाबत विचलित न होता, आपला उत्सव साजरा करण्याची तयारी चालू ठेवावी
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून मांडण्यात आलेल्या 'एक प्रभाग - एक गणपती' धोरणाला गणेशोत्सव समन्वय समितीने विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर आम्ही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत महापालिका व पोलिस विभागावर कामाचा ताण पडणार नाही याची खबरदारी मुंबईतील सार्वजनिक मंडळे घेणार आहेत. मंडळांनी या बाबत विचलित न होता, आपला उत्सव साजरा करण्याची तयारी चालू ठेवावी, असे गणेशोत्सव समन्वय समितीने स्पष्ट केले.
अंधेरी पश्चिम येथील के पश्चिम विभागाच्या वतीने नुकतेच एक पत्रक जारी करण्यात आले होते. त्यानुसार वॉर्डच्या कार्यकक्षेतील सर्व गणपती मंडळांना 'एक प्रभाग - एक गणपती' चे आवाहन करण्यात आले होते. या विभागात १५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं असली तरी १३ प्रभागात १३ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थापन कराव्यात, असे पालिकेने म्हटले होते. मात्र, गणेशोत्सव समन्वय समितीने याला तात्काळ विरोध केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पालिकेने हे परिपत्रक जारी केल्यानंतर के पश्चिम वॉर्डमधील गणेश मंडळांनी गणेशोत्सव समन्वय समितीशी संपर्क साधला. यानंतर समन्वय समितीने ही गोष्ट वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्याचे समजते.
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईची ओळख असलेला गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. मुंबईतील गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची उंची कमी करण्याची तयारी दर्शविली होती. तसेच आगमन आणि विसर्जन मिरवणुकांवरही यंदा निर्बंध लादण्यात आले आहेत.