मुंबईत तरुणीवर सामूहिक बलात्कार, औरंगाबादमध्ये `झिरो` एफआयआर दाखल
सामूहिक बलात्कारानंतर पीडित मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता
औरंगाबाद / मुंबई : मुंबईच्या चेंबूर भागात काही अज्ञातांनी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघड झालीय. ७ जुलै रोजी हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघड झालंय. या प्रकारानंतर पीडित मुलीला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे संबंधित मुलीने हा प्रकार कुणासमोरही उघड केला नाही. परंतु, २५ जुलैपासून या मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात वैद्यकीय चाचणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं... त्यानंतर ३० जुलै रोजी औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी 'झिरो एफआयआर' दाखल करत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मुंबईमध्ये ही मुलगी आपला भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. सध्या तिच्यावर औरंगाबादच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारांनंतर मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं स्पष्ट झालंय.
मुंबई पोलीस पाहतायत कागदपत्रांची वाट
आता हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे (झोन ६) हस्तांतरीत करण्यात आलंय. परंतु, मुंबई पोलिसांना रात्री ११.०० वाजेपर्यंत कोणतेही कागदपत्रं पोहचले नव्हते. पोलिसांच्या हाती कागदपत्रं आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु होणार आहे. एकिकडे 'डिजीटल इंडिया'चा गाजावाजा सुरू असताना पोलिसांना केवळ कागदपत्रं पोहचण्याठी दोन - दिवस लागतात, यावर नाराजी व्यक्त केली जातेय.