जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला बाप्पा
जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला बाप्पा कायम वंदनीय राहिला.
मुंबई : गणपती बाप्पाची अगणित नावं आहे. खंडप्राय भारताच्या कानाकोपऱ्यात गणपतीची मंदिरं आढळतात. इतिहासाची पानं चाळल्यास बाप्पांचा थेट संदर्भ पाचव्या शतकापर्यंत लागतो. भारतात जसे गणपती बाप्पा आहेत तसे ते परदेशातही आहेत. गणपती भारताच्या सीमा ओलांडून पाचव्या शतकामध्येच परदेशात गेल्याचं इतिहास सांगतो. चीन, जपान, इंडोनेशिया, थायलंड, तुर्कस्तान, श्रीलंकेत ठिकठिकाणी गणपती आढळतो. गणपतीचा पहिला ऐतिहासिक पुरावा चीनमध्ये सापडल्याचा दावा केला जातो. पण वस्तूस्थिती तशी नाही. पहिल्या ते पाचव्या शतकापर्यंतच्या काळात एका नाण्यावर गणेशप्रतिमा असल्याचा दावा संग्राहक प्रकाश कोठारींनी केला आहे.
बाप्पाला कधी परदेशी प्रवाशांनी त्यांच्या देशात नेलं. कधी भारतीय व्यापाऱ्यांनी त्याच्यासोबत देशाची वेस ओलांडली. तर कधी भारतीय राज्यकर्त्यांच्या राज्यविस्तारासोबत गणपतीने परदेशागमन केलं. बौध्द धर्मप्रसारकांसोबतही गणपतीने विदेशात पाऊल ठेवलं.
गणपती जिथं गेला तो तिथलाच झाला. जपानचा गणपती, थायलंडचा गणपती, तिबेटातला गणपती जर आपण पाहिला तर तिथला प्रभाव त्याच्या रंगरुपावर स्पष्टपणं दिसतो. गणपतीचं मूळ रुप जरी कायम राहिलं तरी त्यानं जसा देश तसा वेश धारण केला. जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला हा बाप्पा आपल्यासाठी कायम वंदनीय राहिला.