मुंबई : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. पुढच्या वर्षी आपला लाडका बाप्पा ११ दिवस लवकर येणार असल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.  भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) साजरी केली जाते. दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. यात घरगुती गणपतींसोबत विविध मंडळांच्या गणपतींचे विसर्जन प्रामुख्याने याच दिवशी केले जाते. त्याचवेळी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या, असे आवाहन करतात. मात्र, असे असले तरी पुढच्या वर्षी बाप्पा ११ दिवस आधीच येणार आहे. पुढच्या वर्षी श्रीगणेश चतुर्थी शनिवार, २२ ऑगस्ट रोजी येणार आहे. त्यानंतरच्या वर्षी शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ रोजी गणेशचतुर्थी येईल.


मुंबईत जोरदार तयारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहा दिवसांच्या घरगुती तसंच सार्वजनिक गणपतींचं आज विसर्जन होणार आहे. त्यासाठी मुंबईत तयारी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आलीय. ५० हजार पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आली आहे. यावर्षी मुंबईतील धोकादायक पुलांचा मोठा अडथळा विसर्जन मिरवणुकांमध्ये आहे. 


या पुलांवरून सुरळीत मिरवणुका नेण्याचे आव्हान पोलिस, पालिका आणि गणेश मंडळापुढे आहे. वाहतूककोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणुका आणि वाहनचालकांचीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. बाप्पाला निरोप देताना खोल पाण्यात जाऊ नये, तसेच पोलिस, जीवरक्षक यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.


२६ पूल अवजड वाहनांसाठी बंद


मुंबईत गणेशभक्तांना विसर्जनाआधी एक समस्या सतावतेय. मुंबईतील २६ पूल अवजड वाहनांसाठी बंद केले आहेत. हे पूल १६ टनांपेक्षा अधिक वजन पेलू शकणार नाही अशा वेळी गणेश भक्तांनी पुलावर नाचू नये, पुलावर ताण येणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन मुंबईतील सर्वच गणपती मंडळांना गणेशोत्सव समन्वय समितीतर्फे आवाहन करण्यात आलंय. अनेक ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहे त्यामुळे वाहतूक समस्या निर्माण होऊ नये म्हणून मिरवणूक लवकर काढावी, अशी विनंती करण्यात आली आहे.