मुंबईतील अनेक भागांमध्ये वायूगळतीच्या तक्रारी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखलही झाल्या.
मुंबई: राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या (आरसीएफ) चेंबूर येथील प्रकल्पात गुरुवारी रात्री वायूगळती झाल्याच्या अफवेनंतर संपूर्ण मुंबईतून अशाप्रकारच्या बातम्या कानावर येत आहेत.
मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला, अंधेरी आणि कांदिवली अशा विविध भागांमधून गॅसची दुर्गंधी येत असल्याचे दूरध्वनी काल रात्रीपासून अग्निशमन विभागाला येत आहेत. त्यामुळे मुंबईतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नागरिकांच्या तक्रारीनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखलही झाल्या. परंतु, आतापर्यंत कोणत्याही भागात वायूगळती होत असल्याचे निदर्शनास आलेले नाही. तर काही ठिकाणी गॅसची पाईपलाईन बंद केल्यानंतर दुर्गंधी थांबल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, महानगरपालिकेने राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरच्या चेंबूर प्रकल्पात वायूगळती झाल्याचे वृत्त कालच फेटाळून लावले. परंतु, खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने इतर रासायनिक कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला होता.
याशिवाय, राज्य पोलिसांच्या नियंत्रण कक्षानेही आतापर्यंत केवळ वायूगळतीच्या तक्रारीच आमच्यापर्यंत आल्याचे स्पष्ट केले. तसेच महानगर गॅस लिमिटेडने स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, आम्हाला गॅस गळतीच्या तक्रारींचे अनेक फोन रात्री यायला लागले. आमची आपत्कालीन टीम याबाबत अधिक माहिती मिळवत आहे. ज्या भागांतून तक्रारींचे फोन आले त्या सर्व भागात आमच्या टीम सक्रिय झाल्या असून अद्याप आमच्या कोणत्याही पाईप लाईनमध्ये गळती असल्याचे निष्पन्न झालेले नाही, असे महानगर गॅस लिमिटेकडून सांगण्यात आले.