`सामानाचा अग्रलेख उथळ आणि कोती राजकीय मनोवृत्ती दाखवणारा`
मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदेंच प्रत्युत्तर
मुंबई : खाईन, पिईन आणि लिहिन! व्वा, संजू बाबा! असं प्रत्युत्तर मनसेकडून 'सामना' अग्रलेखाला देण्यात आलं आहे. राज्याचा घटलेला महसूल हा एक अत्यंत गंभीर प्रश्न आहे. याबाबत मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या मागणीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख केवळ उथळ नाही, तर त्यांची कोती राजकीय मनोवृत्ती दाखवणारा आहे.
हा अग्रलेख वाचल्यानंतर, शिवसेना विचारांचा आणि वास्तवाचा 'सामना' करायला कधी शिकणार? असा प्रश्न पडला.जगात जी दारू प्यायली जाते, त्यातील २० टक्क्यांहून अधिक दारू एकट्या भारतात रिचवली जाते. (वाईन, डाईन आणि फाईन.. राज ठाकरेंच्या मागणीवर 'सामना'तून चिमटे)
राज्यांच्या महसुलाचा सर्वाधिक हिस्सा दारू करांतून येतो. स्पष्ट सांगायचं तर, देशातील राज्ये, त्यात महाराष्ट्र आलंच, दारूच्या महसुलावर सर्वाधिक अवलंबून आहेत! हे एक 'कटू' नव्हे तर 'आंबट सत्य' आहे! या सत्याचा 'सामना' आपण कधी करणार? अशी टीका मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी केली आहे.
कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. राज्य चालविण्यासाठी महसुलची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज ठाकरेंच्या या मुद्यावरून सामना अग्रलेखातून त्यांना चिमटे काढण्यात आले आहेत. याला आता मनसेकडून प्रत्युत्तर मिळत आहे.