COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई :  मुंबईमध्ये एक मोठी धक्कादायक घटना घडलीय. घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती हाती येतेय. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांमध्ये मारिया नावाच्या महिला पायलटचाही समावेश आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. तर दोघांना अत्यवस्थ अवस्थेत राजावाडी रुग्णालयात हलवण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नुकताच या विमानातून  ब्लॅक बॉक्स सापडलाय. या फ्लाईड रेकॉर्डरमधून अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे.


कसा झाला अपघात?


३० प्रवासी क्षमता असलेलं हे चार्टर्ड विमान असल्याचं समजतंय. 'यूवाय एव्हिएशन'चं सी ९० प्रकाराचं हे चार्टर्ड विमान होतं. हे चार्टर्ड विमान जुहू हेलिपॅडहून टेस्टिंगसाठी निघालं होतं... या दुर्घटनेत एक पायलट, विमानातील इतर तीन व्यक्ती आणि एक पादचारी असे पाच जण मृत्युमुखी पडल्याचं पोलिसांकडून समजतंय. विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' हाती पडल्यानंतर हा अपघात नेमका का झाला? याबद्दल अधिक माहिती समजू शकेल.


'ब्लॅक बॉक्स'मधून काय मिळेल माहिती ?


 एअर ट्राफिक कंट्रोलशी शेवटचं काय बोलणं झालं ?
 
 पायलट आणि को पायलट यांच्यामध्ये काय संभाषण घडल ? 
 
 कोणत्या वेगात हे विमान पुढे चालल होत ?


 दुर्घटना घडली तेव्हा विमान किती उंचीवर होत ?


 दुर्घटना नेमकी कशामुळे घडली ?


मृतांची नावं 


पायलट - मारिया, को-पायलट - प्रदीप राजपूत, विमान तंत्रज्ञ - सुरभी यांचा या अपघातात मृत्यू झाल्याचं समजतंय. 


मृत्युपूर्वी महिला पायलटची सतर्कता


या घटनेत मोठी जिवितहानी थोडक्यात टळलीय. घाटकोपरमधल्या भटवाडी या रहिवासी भागात हे विमान कोसळलं असतं तर मोठा अनर्थ घडला असता. परंतु, पायलटच्या सतर्कतेमुळे हे विमान मैदानी भागात कोसळलं. घाटकोपरमध्ये जागृती इमारतीच्या बाजूला बांधकाम चालू असताना चार्टर्ड विमान कोसळलं. या मैदानाच्या बाजुलाच एक महाविद्यालयही आहे.


यूपी सरकारनं विकलेलं विमान?


उत्तरप्रदेश सरकारनं २०१४ मध्ये खाजगी कंपनीला हे विमान विकण्यात आलं होतं, असं समजतंय. परंतु, ही बातमी आल्यानंतर तातडीनं 'हे विमान उत्तरप्रदेश सरकारनं विकलेलं नाही', असा दावा यूपी सरकारनं केलाय.


नागरिकांत भीतीचं वातावरण


सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलंय. या विमान दुर्घटनेमुळे या परिसरात मोठे स्फोटाचे आवाज परिसरातील रहिवाशांना ऐकायला आले. सोबतच परिसरात आगीचे आणि धुराचे लोळ उठलेत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती दिसून येतेय.