चिमुकलीच्या `या` कृतीने राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं. मात्र, या भाषणानंतर एका चिमुकलीने बोललेल्या दोन शब्दांनी संपूर्ण सभागृहात उपस्थितांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
मनसेच्या या मेळाव्यात राज ठाकरेंनी संबोधित करताना अनेक विषयांवर भाष्य केलं. सध्या सुरु असलेल्या फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन अभिनेते नाना पाटेकर यांनी फेरीवाल्यांची बाजू घेत त्यांची काहीही चूक नसल्याचं म्हटलं. नाना पाटेकर यांनी केलेल्या या वक्तव्याचा राज ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला.
या कार्यक्रमाच्या शेवटी सर्वजण उभे राहीले मात्र, त्याच दरम्यान गर्दीतून एका चिमुकलीचा आवाज येण्यास सुरुवात झाली. मग, ही चिमुकली रस्ता काढत गर्दीतून पूढे आली आणि स्टेजवर दाखल झाली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही त्या चिमुकलीला कडेवर घेतलं त्यानंतर या चिमुकलीने माईकवरुन दोन शब्द बोलले. ते शब्द होते... "राज साहेब अंगार है, बाकी सब भंगार है".
या चिमुकलीचं नाव सिद्धी ज्ञानेश्वर शिंदे आहे. सिद्धी शिंदे ही मुंबई सेंट्रल येथील मनसे पदाधिकारी ज्ञानेश्वर शिंदे यांची मुलगी असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी नाना पाटेकरांची नक्कल करत त्यांना चांगलेच सुनावले. "नाना पाटेकरांनी उगाच चोंबडेपणा करू नये, ज्या विषयाची त्यांना माहिती आहे त्याबद्दलच त्यांनी बोलावे" असे राज ठाकरेंनी म्हटलं.
महात्मा नाना पाटेकरांनी फेरीवाल्यांबद्दल काहीतरी वक्तव्य केले आहे. नानाला वाटते तो चंद्रावरून पडलाय असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.