रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या `त्या` प्रवाशाचा होणार लिलाव
स्थानकाच्या बाहेर जाताना टीसी राम कापडे यांनी या व्यक्तीला तिकीटाची विचारणा केली.
मुंबई: मुंबईसारख्या गजबलेल्या घरात कधी कोणती विचित्र गोष्ट घडेल, याचा नेम नसतो. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनाही काहीसा असाच अनुभव येत असावा. मंगळवारी घडलेल्या एका प्रसंगामुळे या सर्व घटनाक्रमाची सुरुवात झाली.
सीएसटीएम स्थानकावरील फलाटावरुन एक व्यक्ती जात होता. त्याच्यासोबत एक बकरी होती. स्थानकाच्या बाहेर जाताना टीसी राम कापडे यांनी या व्यक्तीला तिकीटाची विचारणा केली. त्यावेळी त्या व्यक्तीने सुरुवातीला खिशात तिकीट शोधण्याचे नाटक केले.
त्यानंतर टीसीचे लक्ष नाही हे बघताच गर्दीत धूम ठोकली. मात्र, तो व्यक्ती त्याच्यासोबतच्या बकरीला तेथेच सोडून गेला. थोड्यावेळासाठी टीसीलाही आता या बकरीचे करायचे काय, असा प्रश्न पडला.
अखेर लोकांनी सल्ला दिल्यानंतर टीसी या बकरीला सीएसटीएमवरील लगेज रुममध्ये घेऊन गेला. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर रेल्वेच्या नियमानुसार या बकरीचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या लगेज रुमबाहेरच्या परिसरात या बकरीला ठेवण्यात आले आहे.
रेल्वेचे सर्व कर्मचारी सध्या या बकरीची काळजी घेत आहेत. ही बकरी याठिकाणी कोणत्याही त्रासाविना राहत आहे. लगेज रुमबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसायला तिला आवडते, अशी तिची काळजी घेणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले.