सोन्याचे दर ४० हजारांवर; पाच महिन्यात पाच हजारांची वाढ
आगामी हंगाम सणासुदीचा असल्याने सोने ४० हजारांपल्याड जाण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याचे भाव वाढल्याने सोन्याचे दर आता थेट चाळीस हजारांवर जाऊन पोहोचले आहेत. आंतररष्ट्रीय स्तरावर मंदीचे सावट असल्याने गुंतवणूकदार सध्या सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात सोन्याचे दर तब्बल पाच हजारांनी वाढले आहेत. आगामी हंगाम सणासुदीचा असल्याने सोने ४० हजारांपल्याड जाण्याची शक्यताही जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.
तर दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महत्त्वपूर्ण आर्थिक घोषणा केल्यानंतर सोमवारी भांडवली बाजारातही तेजी पाहायला मिळाली. सोमवारी बाजार उघताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दीड टक्क्याची उसळी बघयाला मिळाली. सेन्सेक्स ७०० अंशांनी वधारला असून ३७ हजार ४०० वर गेला आहे. तर निफ्टीनेही जवळपास २०० अंकांची उसळी घेत ११ हजारांचा टप्पा ओलांडला.
एकूणच अर्थजगताने सरकारच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, भांडवली बाजार या उपाययोजनांबाबत अजूनही साशंक असल्याचे दिसत आहे. कारण, वरच्या स्तरावर बाजारात व्रिकीचा जोर परतताना दिसला. पण गेले अनेक दिवस तोट्याचे सौदे हाती घेऊन बसलेल्या अनेक ट्रेडर्सना मंदीच्या कचाट्यून सुटण्याची चांगली संधी चालून आली. अर्थात त्याचा फायदा घेत ११ हजाराच्या वर गेलेल्या निफ्टीमधील विक्रीचा जोर इतका वाढला, की बाजार शुकवारच्या तुलनेत जवळपास अर्धा टक्का घसरला. दिवसभर अशी वघ-घट सुरू राहणार आहेत. दुपारी युरोपियन बाजार उघडल्यावर भारतीय बाजारात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाल्याचे चित्र आहे.
आशियातल्या अनेक बाजारांवर अमेरिका-चीन यांच्या व्यापारी युद्धाचा नकारात्मक प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात सुरक्षित बाजार म्हणून भारताकडे आणखी गुंतवणूक वळण्याची चिन्हे आहेत.