मुंबई: जगभरातील कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सोन्याच्या दराने सोमवारी आठ वर्षातील उच्चांक गाठला. सोमवारी मुंबईतील सराफा बाजारात दहा ग्रॅमसाठी सोन्याचे भाव ४७ हजार ८६१ रुपयांपर्यंत वाढला. कोरोनाच्या भीतामुळे जागतिक पातळीवर अनिश्चिततेचे वातावरण आहे. त्यामुळे धास्तावलेले गुंतवणूकदार हमखास परतावा देणाऱ्या सोन्याकडे सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहत आहेत. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणकारांनी यापूर्वीच सोन्याचे दर आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढतील, असा अंदाज वर्तवला होता. एप्रिल महिन्यापासून सातत्याने सोन्याच्या दरात मोठी वाढ होत आहे. ७ एप्रिलला सोन्याचा दर ४५,७२० इतका होता. यानंतर काही दिवसांत सोन्याच्या दराने ४६ हजारांचा टप्पा ओलांडला होता. चालू वर्षात सोन्याच्या भावात १६ टक्के वाढ झाली आहे. सराफा बाजारात चांदीचे भाव देखील वधारले आहेत. मल्टी कमॉडिटी बाजारात (MCX) सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४७६५६ रुपयांवर गेला आहे. तर चांदीचा भाव प्रती किलोला ४८०६५ रुपये झाला आहे.


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनासाठी चीनला जबाबादार धरत त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेही आंतरराष्ट्रीय बाजारात ताण वाढला आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.


काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भारताची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी देवस्थानांचे सोने ताब्यात घेण्याचा पर्याय सुचवला होता. देशातील सर्व धार्मिक स्ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणात सोने पडून आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या जागतिक संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात विविध धार्मिक ट्रस्टमध्ये एक ट्रिलियन डॉलर म्हणजे ७५ लाख कोटींपेक्ष जास्त किंमतीचे सोने पडून आहे. लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. कारण ही संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे. ते सरकारने व्याजावर घेतले पाहिजे. एक-दोन टक्के व्याजदरावर परतीच्या बोलीवर हे सोने ताब्यात घेऊन वापरले पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.