नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून डोंबिवलीतील सोने व्यापारी फरार
बेहिशेबी पैसे आणि सोने गुंतवलेले अनेकजण तक्रारीसाठी पुढेच आलेले नाहीत.
डोंबिवली: डोंबिवलीच्या अजित कोठारी या सोने व्यापाऱ्याने नागरिकांना कोटयवधींचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यानंतर अजित कोठारी दुबईला पळून गेल्याचे समजते.
डोंबिवलीत प्रथमेश ज्वेलर्स हे अजित कोठारीच्या मालकीचे होते. त्याने ग्राहकांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून आपल्याकडे गुंतवणूक करायला लावली. रोख रकमेच्या बदल्यात रोख व्याज आणि १० तोळे सोन्याच्या मोबदल्यात वर्षभरात दोन तोळे सोने निव्वळ व्याज म्हणून मिळेल, असे आमिष त्याने दाखवले होते.
अनेक नागरिकांनी या आमिषाला भुलून अजित कोठारीकडे गुंतवणूक केली. हेच पैसै आणि दागिने घेऊन कोठारी फरार झाला.
याप्रकरणी आतापर्यंत २४ जणांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार बेहिशेबी पैसे आणि सोने गुंतवलेले अनेकजण तक्रारीसाठी पुढेच आलेले नाहीत.
कोठारीला तातडीने शोधून काढण्याची मागणी खुद्द राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
गुंतवणुकदारांच्या पैशातून कोठारीने डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि थेट दुबईतही मालमत्ता विकत घेतल्याची चर्चा आहे. कोठारीचा तपास पोलिसांनी सुरू केलाय.