मुंबई :  शहरामध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे. कोविडाविरोधात उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार आपण निश्चित थांबवू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांत मुंबईत कोविड -१९ चा उपचार करणारी, ७ हजार बेडची संयुक्त क्षमता असलेली रुग्णालये आणि केंद्रे सुरु होणार आहेत.  ही रुग्णालये आणि केंद्रं महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंड या उपनगरांमध्ये सुरु होतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ मे पर्यंत मुंबई शहरात रुग्णखाटांची संख्या २ हजार ४७५ने वाढेल, असेही मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डातल्या खाजगी रुग्णालयांमधून १०० खाटा आणि २० अतिदक्षता रुग्णखाटा ताब्यात घ्यायला राज्य सरकारने सुरुवात केली आहे. रुग्णवाहिन्यांची संख्या  १०० वरुन ४५० पर्यंत वाढवली आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितले. 


दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढवा दोन दिवसांपूर्वी घेतला होता. यावेळी त्यांनी काही सूचना केल्यात. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आपण सर्व अविरत ही लढाई लढत आहात आणि त्यामुळेच आपण निश्चितपणे कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबवू शकतो, असा मला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालये, वैद्यकीय अधिकारी, डीन, डॉक्टर्स यांच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे चर्चा केली. यावेळी प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी, टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन उपसंचालक डॉ.तात्याराव लहाने देखील सहभागी होते.


 एकीकडे आपण या वैद्यकीय आणीबाणीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेले सर्व निदेश व प्रोटोकॉल काटेकोर पाळत आहोत तसेच प्लाझ्मा थेरपी, प्लस ऑक्सिमीटरचा उपयोग या माध्यमातून उपचारामध्ये सहाय्यभूत ठरेल अशी पाऊले उचलत आहोत. पुढील काळासाठी आपण फिल्ड हॉस्पिटल उभारणीवर भर दिला पाहिजे तसेच सुसज्ज कंट्रोल रुमच्या माध्यमातून कोरोना विषयक वैद्यकीय सेवा व सुविधांचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.



मुंबईत विविध ठिकाणी आयसीयू आणि आयसोलेशन बेड्सची सुविधा आपण निर्माण केली आहे. या सुविधांचा उपयोग करण्याची वेळ येऊ नये. परंतु आपले नियोजन चांगले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, येणाऱ्या पावसाळ्यात लेप्टो, डेंग्यू सारख्या आजारांमुळे रुग्ण वाढतील. त्यावरही तातडीने उपचार करावे लागतील यादृष्टीने पालिकेने तयारी ठेवावी,  असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेत.