मुंबईकरांसाठी खुशखबर! यंदा मुबलक पाणी...
राज्यातील बहूतांश भाग हा पावासाविणा कोरडाठाक असला तरी, काही भागात मात्र पाऊस समाधानकारक पडला आहे
मुंबई: मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारे शहापूर तालुक्यातील तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, ते ओसंडून वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या साठवण क्षमतेपेक्षा जास्त असलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे उघडावे लागले आहेत. या दरवाजातूनच अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता यंदातरी मिटल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसत आहे.
विहार तलावही ओव्हरफ्लो
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात मोलाची भर टाकणारा विहार तलावही पूर्ण क्षमतेने भरला आहे. विहार तलावाची क्षमता २७ हजार ६९८ दशलक्ष लिटर्स इतकी आहे. तुलसी, मोडकसागरनंतर आता मुंबईतला विहार तलावही भरून वाहू लागला आहे.
मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाणी प्रश्न मिटण्याच्या मार्गावर
दरम्यान, राज्यातील बहूतांश भाग हा पावासाविणा कोरडाठाक असला तरी, काही भागात मात्र पाऊस समाधानकारक पडला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणं भरू लागली आहेत. नाशिक जिल्ह्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह अर्ध्या राज्याचा पाण्याचा प्रश्न मिटण्याच्या मार्गावर आहे. नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. तर पूणे शहराचाही पाण्याचा प्रश्न मिटलाय. खडकवासला धरणातून पाणी सोडायला सुरूवात झालीय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर, विहार, तानसा हे तलाव भरून वाहू लागलेत. तर पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे पिंपरी चिंचवडकर सुखावलेत.