छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, गुजरात मतदानानंतर राज्यपालांवर कारवाई?
राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राज्यातील राजकारण तापलं
Rajyapal Controversial Statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagat Singh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्ष आक्रमक झालेत. सर्वसामान्य नागरिक असो किंवा उच्च पदावर बसलेली कोणी व्यक्ती असेल त्यांनी कोणत्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करता कामा नये, असं वक्यव्य कोण करत असेल तर अशा व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे, असं मत विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. गुजरात मतदानानंतर (Gujrat Assembly Election) राज्यपालांवर कारवाई होऊ शकते, असा अंदाज असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यपालांचा विषय राजकीय नाही, भाजपचे (BJP) खासदारच त्यांना हटवण्याची मागणी करतायत असंही अजित पवार यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन
दरम्यान, आज राज्यपाल पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आले. महिला कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी राष्ट्रावादीनं गनिमी काव्याने राजभवनावर आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यासर्व प्रकारानंतर पुण्यातील राजभवन बाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दुसरीकडे राज्यपालांविरोधात पुण्यातील स्वराज्य संघटनाही आक्रमक झाली. स्वराज्य संघटनेनंही राज्यपालांना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला .यावेळी कार्यकर्त्यांनी राज्यपालांचा कार्यक्रम उधळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.
हे ही वाचा : आताची मोठी बातमी! पुण्यात 'झिका' व्हायरसचा रुग्ण आढळला
खासदार उदयनराजे भोसलेही आक्रमक
खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) उद्या रायगडावर आक्रोश आंदोलन करणारेत. त्यासाठी आज ते रवाना होतील. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर त्यांना पदमुक्त करण्याची मागणी उदयनराजेंनी केली होती. मात्र त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यानं त्यांनी आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी आज दुपारी ते रायगडाच्या दिशेनं रवाना झाले. त्याआधी सातारा शहरातील पवई नाका इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील. संध्याकाळी महाडमध्ये मुक्काम करून ते उद्या सकाळी रायगडवर पोहचून आक्रोश आंदोलन करतील.