मुंबई: राज्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या मराठा आरक्षण खटल्यातील सरकारी वकील मुकूल रोहतगी यांना हटवणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना दिले आहे. संभाजीराजे यांनी ट्विट करून यासंदर्भात खुलासा केला. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या खटल्यातील वकील बदलले जाणार नाहीत, अशी ग्वाही मला दिली. मराठा आरक्षणाचा खटला पूर्वीप्रमाणेच ताकदीने लढवला जाईल. त्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवण्यात येणार नाही. यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानत असल्याचे संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा आरक्षण मिळवण्याकरिता समाजाने खूप मोठा त्याग केला आहे. अनेक दशकांपासून हा लढा चालू आहे. कित्येकांनी आपले बलिदानही दिले. आजही मराठा आरक्षणाची केस सर्वोच्च न्यायालयात लढवली जात आहे. मी स्वत: प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहतो. मात्र, अचानक सरकारी वकील बदलल्याने माझ्या मनात चिंता निर्माण झाल्याचे संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. 





काही दिवसांपूर्वीच खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली होती. या सगळ्यांनी दंगल नव्हे तर आंदोलन केले होते. हे आंदोलन वैयक्तिक अजेंड्यासाठी नव्हे तर समाजाच्या हितासाठी होते. त्यामुळे या मराठा आंदोलनातील गुन्हे सरसकट मागे घ्यावेत, असे संभाजीराजेंनी म्हटले होते.