दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेदरम्यान राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींवर शुक्रवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाष्य केले. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हायला नव्हती पाहिजे, असे मत त्यांनी मांडले. तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भल्या पहाटे आटोपण्यात आलेल्या शपथविधीचेही त्यांनी समर्थन केले. या वेळेला रामप्रहर म्हणतात. मग रामप्रहरी शपथ घेतली तर प्रहार कशाला करता, असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज राजभवनावर राज्यपालांच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन झाले. यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांनी म्हटले की, मी एक वर्ष अजून मुंबईत राहिलो तर पूर्णपणे मराठीत बोलेन. महाराष्ट्राचे राज्यपाल बनायचे आहे हे सांगितले तेव्हा विश्वास बसत नव्हता. मी आलो तेव्हा वादळी पाऊस होता, नंतर राजकीय पाऊस पडला. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हायला नव्हती पाहिजे, असे त्यांनी म्हटले. 

तसेच कोरोनाच्या काळात राज्य सरकारने चांगले काम केल्याची पोचपावतीही राज्यपालांनी यावेळी दिली. राज्य सरकारशी माझा कोणताही संघर्ष नाही. सर्वजण माझे मित्र आहेत. उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरच्या निवडीवेळीही मी नियमाप्रमाणे वागलो. त्यावेळी ज्यांनी १२ विधानपरिषद सदस्यांची नावे पाठवणे अपेक्षित होते, ती पाठवली नाही. नंतर राज्यपालांना शिव्या देण्यात आल्या, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितले. तसेच कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. निर्भीड आणि सावध राहून कोरोनाचा सामना करण्याची गरज असल्याचेही राज्यपालांनी सांगितले. 


'धोतर आणि कुर्ता घालतो तर लोकांना वाटते मला इंग्रजी येत नसेल'
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या कार्यक्रमात अनेक विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. त्यांनी म्हटले की, अनेकांना वाटते मी धोतर आणि कुर्ता घालतो म्हणजे मला इंग्रजी येत नसेल. महाराष्ट्रात मी आतापर्यंत अनेक ठिकाणी फिरला आहे. मला फिरण्याची आवड आहे. कोरोनाची साथ येण्यापूर्वी मी नंदूरबार आणि गडचिरोलीच्या दुर्गम भागात गेलो होतो. तेथील गावांमध्ये मुक्काम केला होता, अशी आठवणही यावेळी राज्यपालांनी सांगितली.