मुंबई: शिवसेनेला संख्याबळ सिद्ध करण्यात अपयश आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. रात्री साडेआठ वाजता राज्यपालांनी राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांना राज्यपालांनी फोन केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता राज्यपाल राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा शिवेसनेसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. आज सकाळपासून सुरु असलेल्या चर्चेनंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीने सरकार स्थापन करणार, असे छातीठोकपणे सांगितले जात होते. शिवसेनेचे शिष्टमंडळ राजभवनात दाखल झाल्यावर यावर जणू शिक्कामोर्तबच झाल्याची भावना सर्वांमध्ये होती. मात्र, तब्बल पाऊणतासानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्रे राजभवनापर्यंत पोहोचलीच नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. 



यानंतर आदित्य ठाकरे यांनी राजभवनाबाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, राज्यपालांकडून काल संध्याकाळी आम्हाला सत्तास्थापनेसंदर्भात विचारणा करण्यात आली. आमच्याकडे अवघ्या २४ तासांचा अवधी असूनही आम्ही वेगाने हालचाली करत काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी सुरु केली. या दोन्ही पक्षांनी आम्हाला तत्वत: पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्हाला आणखी दोन दिवसांचा अवधी द्यावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली. मात्र, ही मागणी राज्यपालांनी फेटाळून लावली, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.