मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला कौल मिळाला असला तरी युतीत सत्तेतील वाट्यावरुन घोडे असडले आहे. शिवसेनेने ५०-५० जांगाची मागणी केली आहे. मात्र, भाजपकडून या मागणीला दुजोरा मिळत नाही. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षाच्या बैठकीत केली आहे. त्यामुळे युतीतील तणाव वाढला आहे. शिवसेना आणि भाजप दबाव वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यपाल राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. मात्र, ही भेट एकत्रित नव्हती तर ती स्वतंत्र होती. त्यामुळे युतीत आलबेल असल्याचे पुढे आले आहे. शिवसेनेकडून या भेटीबाबत सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सत्तास्थापनेच्या प्रयत्नांच्या दिशेने आता वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. आज सकाळी शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी राजभवनात येऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ही स्वतंत्र भेट असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, त्याचेवळी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. दोघांची चर्चाही झाली. मात्र, चर्चैत काय घडले, त्याची माहिती मिळालेली नाही. 


दिवाकर रावते राज्यपालांना भेटून बाहेर येताच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले, आपण राज्यपालांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. मी मुंबईचा महापौर होतो तेव्हापासून म्हणजे १९९३ पासून हा दिवाळीचा शिरस्ता पाळत आहे. दरवर्षी पाडव्यादिवशी मी राज्यपालांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत असतो.  


दरम्यान, राज्यात सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. जागावाटपानंतर आता भाजप आणि शिवसेनेतच आकड्यांची शर्यत सुरू झाली आहे. सामर्थ्य दाखवण्यासाठी शिवसेनेने अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यास सुरुवात केली आहे. याद्वारेच बच्चू कडू, राजकुमार पटेल, आशिष जयस्वाल, नरेंद्र गोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.


तसेच भाजपनेही १५ अपक्ष आमदारांनी आमच्याशी संपर्क केला असल्याचे निकालादिवशीच म्हटले होते. मात्र, भाजपने जरी दावा केला असला तरी शिवसेनेच्या मदतीशिवाय सरकार स्थापन करु शकत नाही, अशी संख्याबळावरुन परिस्थिती दिसून येत आहे. तसेच निम्मा जागा मिळाल्या नाहीतर वेगळा विचार करावा लागेल, असे संकेत अप्रत्यक्ष शिवसेनेने दिले आहेत. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप कसे सरकार स्थापन करते, ते आम्ही बघतो, असा इशाराही दिला आहे. त्यामुळे युतीचे सरकार होणार की स्वतंत्र भाजपचे होणार? याचीच उत्सुकता आहे.


विधानसभेतील संख्याबळ 


भाजप १०५, शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, एमआयएम २, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २, माकप १, जनसुराज्य शक्ती १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना १, राष्ट्रीय समाज पक्ष १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष १३. एकूण जागा २८८.