मुंबईत राज्य राखीव पोलीस दल तैनात करणार
लॉकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीसाठी नव्या उपाययोजना
प्रतिनिधी : मुंबईत कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका निर्माण झाल्यानं लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. संचारबंदी पाळण्याच्या दृष्टीनं पोलिसांच्या मदतीला आता राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात येणार आहे. याशिवाय फायरब्रिगेडद्वारे झोपडपट्ट्यांमधील शौचालयांचं दर एक-दोन तासांनी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्यानं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. लोकांना घरी राहण्यास सांगितलं तरी ते बाहेर येतातच हे लक्षात घेऊन लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी मुंबईतील मंत्र्यांनी केली आणि त्यासाठी काही उपाययोजनांची चर्चाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली.
पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलीस दलाला पाचारण करून अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याशिवाय काही ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर सीसीटीव्ही बरोबरच ड्रोनच्या सहाय्यानं लक्ष ठेवून सोशल डिस्टसिंग पाळलं जाईल याची खबरदारी घेतली जाणार आहे.
शौचालयांमध्ये निर्जंतुकीकरण
स्वच्छतेचा विशेष म्हणजे झोपडपट्टीतील शौचालयांच्या स्वच्छतेचा आणि निर्जंतुकीकरणाचा मुद्दा गांभीर्यानं चर्चिला गेला. फायर ब्रिगेडच्या सहाय्यानं शौचालयांमध्ये तर तासा-दोन तासाला निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच काही ठिकाणी ड्रोनच्या सहाय्यानं निर्जंतुकीकरण करण्याची सूचनाही करण्यात आली. ड्रोनचं नवं तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात येणार आहे.
घरपोच जेवण
याशिवाय हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होऊ नयेत यासाठी आणखी उपाययोजना सूचवण्यात आल्या. एनजीओच्या मदतीनं तयार जेवण पुरवण्यात येत असलं तरी यापुढे कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तयार जेवण घरोघरी पोहचवण्यात येणार आहे.
शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था
याशिवाय मुंबईतील घरं छोटी असल्यानं त्यात लोक दाटीवाटीनं राहतात. त्यामुळे ज्या घरात जास्त लोक असतील त्यापैकी काहींची व्यवस्था जवळच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येणार आहे.
याशिवाय एक लाख कीटची मागणी केंद्राकडे करण्यात आली असून कीट उपलब्ध होताच जास्तीत जास्त टेस्ट केल्या जाणार आहेत. विशेषतः हेल्थ वर्करचीही तपासणी केली जाणार आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आणखी काटेकोर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.