GPT Healthcare Limited IPO Details: आरोग्य सेवा श्रेत्रात काम करणाऱ्या जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. आयएलएस हॉसपिटल्स नावाने नोंदणी असलेल्या या कंपनीची मल्टिस्पेशलिटी रुग्णालये देशभरामध्ये आहेत. या आयपीओचा प्राइज बॅण्ड 177 ते 186 रुपये इतका आहे. या आयपीओला संमिश्र प्रतिसाद मिळत असून 11 टक्क्यांपर्यंत बुकींग झाली आहे.


अँकर इनव्हेस्टर्सची बोली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून आयपीओची विक्री होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी (21 फेब्रुवारी 2024) कंपनीच्या अँकर इनव्हेस्टर्सने शेअर्ससाठी बोली लावली. या बोलीच्या माध्यमातून कंपनीला 157.54 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यश आलं आहे. वेगवेगळ्या 15 म्युच्युअल फंड कंपन्या आणि वित्तीय संस्थांनी प्रत्येक 186 रुपयांना हे शेअर्स विकत घेतले आहेत. 


कधीपर्यंत लावता येणार बोली?


जीपीटी हेल्थकेअर लिमिटेड कंपनीच्या आयपीओची विक्री 26 फेब्रवारीपर्यंत होणार आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. गुंतवणूकदारांना 26 फेब्रुवारी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत आयपीओसाठी बोली लावता येणार आहे. ऑफर फॉर सेल म्हणजेच ओएफएसच्या माध्यमातून कंपनी 2.6 कोटींचे शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध करुन देणार आहे. हे शेअर्स बॅनियान ट्री ग्रोथ कॅपिटल्सच्या मालकीचे आहेत. बॅनियान ट्री कंपनीचा जीपीटी हेल्थकेअरमध्ये 32.34 टक्के वाटा आहे. हा संपूर्ण हिस्सा कंपनी विकणार आहे. दुसरीकडे जीपीटी हेल्थकेअरची मालकी असलेल्या कंपनीने नव्याने 40 कोटी रुपये मुल्यांच्या शेअर्सची विक्रीचा निर्णय घेतला आहे. जेएम फायनान्शियल्स ही जीपीटी हेल्थकेअरच्या आयपीओ विक्रीची एकमेव व्यवस्थापक कंपनी आहे.


कंपनीची योजना काय?


या आयपीओ विक्रीमधून उभ्या राहणाऱ्या एकूण निधीपैकी 30 कोटींचा वापर कर्ज फेडण्यासाठी केला जाणार आहे. आयपीओ विक्रीमधून कंपनीला 525.14 कोटी उभारायचे आहेत. जीपीटी हेल्थकेअरने कोलकात्यामध्ये 2000 साली 8 खाटांची रुग्णालये उभारण्यास सुरुवात केली. जीपीटी हेल्थकेअरचे संचालक असलेल्या अनुराग तांतिया यांनी, आगामी काळामध्ये प्राथमिक विस्ताराचा विचार केल्यास प्रत्येक 10 हजार लोकसंख्येमागील केवळ 10 हॉस्पिटल बेड्स असलेल्या पूर्व भारतामध्येच विस्तार करण्याचा मानस असल्याचं सांगितलं. सध्या कंपनीची एकूण 4 मल्टीस्पेशालिटी रुग्णालये आहेत. यामधील एकूण बेड्सची संख्या 561 इतकी आहे.


अन्य एक आयपीओही बाजारात


जीपीटी हेल्थकेअरच्या आयपीओप्रमाणेच आणखीन एक आयपीओ उद्यापासून म्हणजेच 23 फेब्रवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. देशातील सागरी श्रेत्राच्या विविध विभागांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'सावध शिपिंग लिमिटेड'नेही आयपीओची घोषणा केली आहे. बीपीसीएल, डीआरडीओ, ओएजीसीसारख्या सरकारी आणि निमसरकारी उपक्रमांप्रमाणेच प्रमुख बंदरांना देवा देणारी कंपनी आहे. सावध शिपिंगच्या प्रत्येक आयपीओची किंमत 95 रुपये इतकी असणार आहे. या आयपीओमधून कंपनीला 38.18 कोटी रुपयांचे भांडवल उभे करायचे आहे. 23 फेब्रवारीपर्यंत हा आयपीओ विकत घेता येणार आहे.