कमळाबाईच्या `विजया`ला लोकांनी चोपले
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विजयात भाजपने मुसांडी मारल्याचे चित्र आकड्यांचे खेळ करून रंगवले जाते आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तूस्थिती वेगळीच आहे. कमळाबाईच्या `विजया`ला लोकांनी चोपले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विजयात भाजपने मुसांडी मारल्याचे चित्र आकड्यांचे खेळ करून रंगवले जाते आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तूस्थिती वेगळीच आहे. कमळाबाईच्या 'विजया'ला लोकांनी चोपले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र अशी ओळख असलेल्या दै. सामनात 'मेंढ्यांचे कोकीळगान!' या मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी एक लेख लिहीला आहे. या लेखात उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विजयी दाव्यावर सडकून टीका केली आहे. तसेच, शिवसेना आणि राष्ट्रवादीसह इतरही पक्षांची कामगिरी चांगली झाल्याचे म्हटले आहे.
भाजपने दाखवलेल्या वियजांच्या आकडेवारीवर प्रतिक्रीया व्यक्त करत ठाकरे यांनी म्हटले आहे की, 'लोकांना दिलासा देण्याचे कर्तव्य पार पाडण्याऐवजी फक्त निवडणुका जिंका व विजयाचे ढोल वाजवा हेच जणू ईश्वरी कार्य फडणवीस सरकारने अंगीकारले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे. भाजपने आकड्यांचा खेळ कितीही करूद्यात, सत्य वेगळेच आहे. ते सत्य स्वीकारले तर लोकांचा मान ठेवला असे होईल. पराभवाच्या मानेवर पाय ठेवून विजयाच्या किंकाळ्या मारता येणार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय गांडो थयो छे! विजय वेडा झाला आहे व लोकांनी विजयाला चोपले आहे!'
याच लेखात ठाकरे यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरूही भाजपवर निशाणा साधला आहे. 'अनेक ठिकाणी प्रस्थापितांना भुईसपाट करून नव्या, ताज्या दमाच्या मंडळींना मतदारांनी संधी दिली आहे. त्यात सर्वच पक्षांच्या मातब्बरांचा समावेश आहे. आमच्या पक्षास इतक्या ग्रामपंचायती विजयांचा आकडा लागला, वगैरे गमजा आज तरी कुणी मारू नये. कर्जमाफीची दमडीही शेतकऱ्यांच्या हाती न पडता कर्जमाफीचे श्रेय फक्त जाहिरातबाजीतून लाटल्यासारखेच मग हे होईल, असा निशाणा उद्धव यांनी साधला आहे'.
दरम्यान, ‘कमळा’बाईचीच मैफल सजावी त्यासाठी थेट सरपंच निवडीचा कायदा मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने केला, पण तरीही नक्की किती ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले? असा सवाल विचारतानाच नगरपालिकेत बहुमत कोणत्याही पक्षाचे येऊ द्या. थेट नगराध्यक्ष किंवा सरपंच निवडणुकीत साम-दाम-दंड-भेद नीतीने आम्ही माणसे निवडून आणू. यात ‘दाम’ महत्त्वाचे आहे व ते भरपूर असल्याने ‘थेट’ पद्धतीत त्यांना ते फायद्याचे ठरत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला आहे.