मुंबई: वस्तू व सेवा कर कायद्यातंर्गत (जीएसटी) राज्यात पहिली मोठी कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या जीएसटी कार्यालयाकडून शुक्रवारी मोदसिंग पद्मसिंह सोढा या व्यापाऱ्याला अटक करण्यात आली. सोढा यांनी बनावट बिलं सादर करून तब्बल ७९ कोटींची जीएसटी चुकवला होता. ही गोष्ट जीएसटी इंटेलिजन्सच्या लक्षात आल्यानंतर सोढा यांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. पुण्यातील न्यायालयाने सोढा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत एका उद्योजकाने तब्बल १००० कोटींची खोटी बिले सादर केल्याचे प्रकरण समोर आले होते. मात्र, या सगळ्याची चौकशी सुरु असून संबंधित उद्योजकांवर कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. मात्र, सोढा यांना जीएसटी कायद्याखाली अटक झाल्याने करचुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.