मुंबई : कार विक्रीत प्रत्येक दिवशी घट होताना दिसत आहे. दुसरीकडे सरकार जुलै महिन्यात आपला बजेट सादर करणार आहे. यात वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर - जीएसटी २८ वरून १८ वर करण्यात येणार आहे. निश्चितच हा निर्णय झाला, तर नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे. नवीन सरकार आपला पहिला बजेट जुलै महिन्यात सादर करणार आहे. वाहननिर्मात्यांची संघटना सियामने सरकारला प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जुनी वाहनं बंद करण्याच्या भूमिकेला, प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत सियाम यांची बैठक झाली. यात सर्व वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करण्यात यावा, अशी मागणी सियाम संघटनेने केली. 


ही मागणी मान्य झाली, तर वाहनांच्या किमती निश्चितच कमी होतील. ऑटो उद्योगाला मागील ११ महिन्यांपासून घर घर लागली आहे, मात्र जीएसटी कमी करण्याचा निर्णय झाला, तर ऑटो उद्योग पुन्हा तेजीत येणार आहे.


प्रवासी वाहनांच्या विक्रीत १७.०७ टक्के घट झाली आहे. मागील ८ वर्षात ही सर्वात मोठी घट आहे. याआधी ऑक्टोबर २०११ साली वाहनांच्या विक्रीत यापेक्षा मोठी घट झाली होती.


सरकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सियामने जुन्या वाहनांना भंगारात काढण्याच्या भूमिकेची देखील बाजू मांडली. स्थानिक वाहन निर्मिती उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण आयात केलेल्या वाहनांना सीमा शुल्क २५ टक्क्यांवर ४० टक्के वाढवण्याचीही मागणी करण्यात आली आहे.