गुणरत्न सदावर्ते अखेर 18 दिवसानंतर तुरुंगातून बाहेर, जेल बाहेर स्वागत
गुणरत्न सदावर्ते हे तुरुंगातून बाहेर आले आहेत. त्यांना कोर्टाने आज जामिन मंजूर केला आहे.
मुंबई : गुणरत्न सदावर्ते 18 दिवसनंतर बाहेर आले आहेत. जेल बाहेर सदावर्ते यांच्या स्वागतासाठी हार आणि पेढे आणले गेले आहेत. 'हम है हिदुस्थानी. हा विजय हिंदुस्थानींचा आहे. पत्नी, मुलगी आणि मित्र परिवाराने साथ दिली. हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही.' असं ही त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करता येईल ते करु. भ्रष्टाचाराविरोधात लढू असं देखील सदावर्ते यांनी म्हटलं आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला होता. पुण्यात दाखल एफआयआरबाबत सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
गुणरत्न सदावर्ते यांनी आर्थर रोड जेलमध्ये उपोषण सुरु केल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली होती. त्यांनी अन्न न घेण्याचं ठरवलं होतं. पुण्यात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांना सदावर्तेंचा ताबा हवा होता. पण न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.
शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यानंतर सदावर्ते यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आले. ज्यामुळे विविध ठिकाणच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण अखेर आज त्यांना दिलासा मिळाला असून त्यांची तुरुंगातून सूटका झाली आहे.