Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा झटका बसला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची दोन वर्षांकरिता वकीलीची सनद रद्द करण्यात आली आहे. अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रने ही कारवाई करताना दोन वर्षांसाठी त्यांची वकीलीची सनद रद्द ठरवली आहे. त्यामुळे त्यांना आता वकीली करता येणार नाही दोन वर्षांची कारवाई केल्याची माहिती अ‍ॅड. मंचरकर यांना आणि बार काऊंसिल ऑफ इंडियालाही पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.


सदावर्ते यांच्याकडून आचारसंहितेचे उल्लंघन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात तक्रार करताना अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन म्हटले होते. मंचरकर यांनी  बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्रकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. गुणरत्न सदावर्ते हे पेशाने वकील असतानाही सामाजिक पातळीवर वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. एसटी आंदोलनात वकिलांचा ड्रेस परिधान करुन सहभाग घेणे, पाठिंबा देणे आणि एसटी कर्मचाऱ्यांसोबत बैठका घेणे हे वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हटले होते.


या तक्रारीची दखल घेत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रने सदावर्ते यांना  7 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई सुरु केली होती. मात्र ही कारवाई राजकीय हेतून प्रेरित आहे, असा दावा गुणरत्न सदावर्ते यांनी केला होता. या कारवाईविरोधात सदावर्तेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.


मुंबई हायकोर्टाने सदावर्ते  फटकारले


सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.  कोर्टाने सदावर्तेंना जोरदार शब्दात फटकारले. तुमच्याविरोधातील तक्रार राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला म्हणून तुम्हाला विशेष वागणूक देणार नाही. प्रथमदर्शनी महाराष्ट्र बार कौन्सिलच्या नोटिशीमध्ये काही चुकीचे दिसून येत नाही. अशा स्थितीत आम्ही तुम्हाला बार कौन्सिलविरोधात चुकीचा प्रचार करता येणार नाही, असे खंडपीठाने सदावर्ते यांना बजावले.


गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सक्रीय सभाग घेतला होता. त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्वही केले होते. तसेच राज्य सरकारवरही गंभीर आरोप केले होते. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात याआधी फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.  मुंबई, सातारा पाठोपाठ अकोल्यात तक्रारही दाखल झाली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीच्या आरोपांप्रकरणी सदावर्तेंवर अकोटमध्ये गुन्हा दाखल झाला. या तक्रारी आधी  सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.