मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निम्मी फी परत करणार
मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा
मुंबई : पूर्ण शुल्क भरून महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं निम्मं शुल्क परत करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. आठ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना निम्मं शुल्क परत केलं जाईल. आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना ६०५ अभ्यासक्रमांसाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.
चंद्रकात पाटील यांनी माहिती दिली की, 'मराठा समाजातील 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना 605 अभ्यासक्रमासाठी निम्मे शुल्क भरून प्रवेश देण्यात यावा, असा निर्णय घेतला आहे. असे प्रवेश न देणाऱ्या महाविद्यालय, संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सर्वच संस्था, महाविद्यालयांनी निम्मे शुल्क भरून प्रवेश दिले आहेत. तरीही ज्या विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के शुल्क भरून प्रवेश दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे निम्मे शुल्क परत करण्यात येणार आहे.'
विविध अभ्यासक्रमासाठी पूर्ण शुल्क भरलेल्य़ा पण वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असलेल्या विद्यार्थ्यांचं निम्मे शुल्क परत करण्याचेो आदेश महसूलमंत्री आणि मराठा आरक्षणासंबंधी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.