आमदार शपथविधी आधी विधिमंडळ परिसरातील घडामोडींवर नजर
महाराष्ट्राने एक वेगळे चित्र पाहिले. विधिमंडळात नवीन आमदारांच्या शपथविधीआधी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेतली.
मुंबई : महाराष्ट्राने एक वेगळे चित्र पाहिले. विधिमंडळात नवीन आमदारांच्या शपथविधीआधी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार, आदित्य ठाकरे, रोहित पवार यांची गळाभेट घेतली. त्याधी सुप्रिया सुळे या प्रत्येक नव्या आमदारांचे स्वागत करत होत्या. त्यावेळी सोबत दिलीप वळसे-पाटील होते. महिनाभरात नीटशी झोप नाही पण तरी आज सगळा ताण दूर पळाला होता. जणू घरचा एखादा लग्न सोहळा असावा अशा सुप्रियाताई सगळ्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या, आल्यागेल्याचं स्वागत, कौतुक सुरू होते. त्यात मग विरोधकांचंही त्यांना वावडे नाही हेही दिसले. जे बाबांनी शिकवलं तेच दिसले. आशीष शेलार आले देवेंद्र फडणवीस आले प्रत्येकाचं हसतमुख चेहऱ्यानं स्वागत केले.
शपथविधीची वेळ जवळ यायला लागली तशी गर्दी वाढायला लागली. हॉटेलमध्ये असलेले सगळ्याच पक्षांचे आमदार आले. इथे अनेक नातीही दिसली. चार दिवसांपूर्वी धनंजय मुंडे अजित दादांसोबत दिसले तेव्हा दुखी झालेल्या सुप्रियांनी आज धनंजय मुंडेनाही मिठी मारली. ही दृश्य खूप काही सांगून गेली. अजित पवारांची मनधरणी करणारे जयंत पाटील, देवेंद्र पडणवीस दिसताच खुलले, त्यांच्या स्वागतासाठी गेले. दोघांनी प्रसारमाध्यमांना छान पोझ दिली आणि पुढे गेले.
बाप्पाचं दर्शनानंतर विधानभवन
आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात करताना दैवताची आठवण प्रत्येकालाच येते मग तो सामान्य माणूस असो की मग एखाद्या राजकीय घराण्यातलं महत्त्वाचं व्यक्तीमत्त्व, युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवरून बाहरे पडताच गाठले ते सिद्धीविनायक मंदिर, बाप्पाचं दर्शन घेऊन मग गाठलं विधानभवन.
रुसवे फुगवे दूर झाले - सुप्रिया
सत्ता येत जात राहते नाती कायम राहतात हे सुप्रिया सुळेंचे वाक्य खूप काही सांगून गेले. भावा बहिणीचं नातं सगळ्यांसाठीच महत्त्वाचं पण या भावाबहिणीचं नातं विशेष कारण या नात्यातल्या प्रत्येक हालचालीवर कोट्यवधी नजरा खिळल्यायत. रुसवे फुगवे दूर झाले, संणांना एकत्र येणं होईल पण अजित दादा परत जाईल का ही भीती मात्र कायम राहील.
भविष्यात उत्तम काम - तटकरे
महाविकासआघाडी भविष्यात उत्तम काम करेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. महाविकासआघाडीचं श्रेय तिन्ही पक्षांच्या नेत्यांना जातं असंही ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे, पवारांचे नातू रोहित पवार आणि खासदार सुनील तटकरेंची कन्या आदिती तटकरे यांनी आज आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली. या तिन्ही नेत्यांनी आज आमदारपदाची शपथ घेतली.
मी राष्ट्रवादीत होतो, आहे - अजित पवार
मी राष्ट्रवादीत होतो, आहे आणि राहणार असं अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपाशी हातमिळवणी केल्याबद्दल त्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आपण राष्ट्रवादीमध्येच असल्याचं उत्तर दिलं. अजित पवारांनी मंगळवारी रात्री सिल्व्हर ओक इथं जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यासंबंधी विचारण्यात आलं असता, शरद पवार आपले नेते आहेत म्हणूनच भेटायला गेला होतो असं त्यांनी सांगितलं.
'पाच वर्षे शेतकरी, अपंगांसाठी'
आगामी पाच वर्षे शेतकरी, अपंगांसाठी असतील अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिलीय. ७० वर्षांत जे राहून गेलं ते या पाच वर्षांत सुटणार नाही असंही ते यावेळी म्हणाले.
'पाच वर्षे यशस्वीरित्या कारभार'
पुढील पाच वर्षे यशस्वीरित्या कारभार करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिलीय. तसेच अजित पवार पक्षात सक्रिय होते आणि राहतील असंही ते यावेळी म्हणालेत. राष्ट्रवादीच्या आमदारांचा संघर्ष, ऐक्याचा सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिलीय.
तीन दिवसांच्या हॉटेलमधील वास्तव्यानंतर आमदार विधान भवनात पोहोचले. काँग्रेसचे आमदार जे डब्ल्यू मारियड या पंचतारांकित हॉटेलमधून सकाळीच विधान भवनामध्ये शपथविधीसाठी निघालेत. सकाळीच हे सर्व आमदार आपल्या सामान सहीत बसमध्ये तयार करत तयारी करत होते.