मनसेत इनकमिंग सुरु; हर्षवर्धन जाधव, प्रकाश महाजन स्वगृही
हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासह शिवसेनेच्या दोघांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.
मुंबई : दोन विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगली कामगिरी करता आली नाही. दोन्हीवेळा केवळ एकच उमेदवार विजयी झाला. तर त्याआधीच्या निवडणुकीत १२ उमेदवार निवडून आले होते. हा अपवाद वगळता मनसेला चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे न करता भाजप आणि मोदींविरोधात प्रचार केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपल्या उमेदवारांना निवडून द्या, अशी साद मतदारांना घातली. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. केवळ कल्याणमधून एक उमेदवार निवडून आला. आता मनसेनेने हिंदूकार्ड बाहेर काढले आहे. आपल्या पक्षाचा झेंडा बदलला. हिंदूत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर अनेक नेते पुन्हा मनसेत येण्यास सुरुवात झाली आहे. आज शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी पुन्हा मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.
हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांचा पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘कृष्णकुंज’वर प्रवेश झाला. यावेळी त्यांचे नवा पक्षाचा ध्वज देऊन स्वागत करण्यात आले. तसेच औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दशरथे यांनीही मनसेत प्रवेश केला. तसेच शिवसेनेचे नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही मनसेत जाहीर प्रवेश केला.
पक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेने जोरदार मुसंडी मारली. पक्षाचे १२ आमदार निवडून आले होते. यात औरंगाबादमधील कन्नड येथून हर्षवर्धन जाधव हे निवडून आले होते. त्यानंतर मतभेद झाल्यानंतर मनसेवर टीका करत शिवसेनेत प्रवेश केला. ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत पुन्हा आमदार झाले. हर्षवर्धन जाधव हे औरंगाबाद जिल्ह्याच्या राजकारणातील सतत वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात आहे. जाधव हे भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत.
हर्षवर्धन जाधव यांना लोकसभेनंतर विधानसभेतही पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या राजकीय जीवनासोबतच व्यक्तिगत जीवनही नेहमीच वादळी ठरले आहे. हर्षवर्धन जाधव हे मनसेच्या तिकिटावरच आमदार झाले होते. पण नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. अपक्ष, मनसे, शिवसेना, पुन्हा अपक्ष असा त्यांचा प्रवास झाला आहे.
तसेच पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन हे प्रमोद महाजन आणि प्रवीण महाजन यांचे ज्येष्ठ बंधू होत. महाजन बंधूंच्या वादानंतर ते विशेषत्वाने प्रकाश झोतात आले. प्रकाश महाजन हे सध्या राजकारणात सक्रिय नसले, तरी मनसेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पक्षासाठी काम केले होते. २००९मध्ये त्यांना मनसेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र अवघ्या दोन वर्षांत म्हणजे २०११ मध्ये त्यांनी शिवसेनेलाही रामराम ठोकला. राज ठाकरे यांनी हिंदुत्व स्वीकारले, तर त्यांच्यासारखा मोठा हिंदुत्ववादी नेता नसेल, ते जी भूमिका घेतील ही स्वागतार्ह असेल, अशा भावना प्रकाश महाजन यांनी व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पटल्याने मी त्यांच्यासोबत यायचे ठरवले, असे ते म्हणालेत.