मुंबई : आज हरतालिका तृतीया भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते. अशी आख्यायिका आहे की, भगवान शंकर पती म्हणून मिळावे, यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तेव्हापासून लग्न झालेल्या महिलांपासून ते कुमारिका देखील दरवर्षी हरतालिकेचे व्रत न चुकता करतात. निर्जळी किंवा न खात हरतालिकेचे व्रत करण्याची प्रथा आहे. सौभाग्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. हरतालिकेच्या व्रतात उमा-महेश्वर यांचे पूजन केले जाते. या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी खास पूजा केली जाते. या दिवशी शिवाजी पूजा केली जाते. हर हे शिवचे नाव आहे. त्यामुळे या व्रताला हरितालिका तृतीया असं म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने हा उपवास आपल्याला हवा तसा किंवा योग्य पती मिळावा या उद्देशाने केला जातो. 


अशा प्रकारे मिळेल उपवासाचे फळ 


सकाळपासून अगदी निर्जल हा उपवास करावा. मात्र तब्बेत ठीक नसल्यास या दिवशी फळं खाल्ली तरी चालतील. संध्याकाळी शिव आणि पार्वतीची उपासना करावी. या पूजेवेळी महिला श्रृंगार करून उपस्थित असणं अत्यंत महत्वाचं आहे. यामागचं कारण की स्त्रिया या पेहरावात अतिशय सुंदर दिसतात. त्यानंतर पार्वतीला सौभाग्य वस्तू अर्पण करून आशिर्वाद घ्यावा. गावागावांमध्ये हरतालिकेच्या रात्री जागरण केले जाते. मुली आणि महिला एकत्र येऊन फुगड्या घालतात. आणि हा उत्सव साजरा करतात. 


प्रामुख्यानं सिंधुदुर्ग, गोवा, कर्नाटक किनारपट्टी भागात राहणाऱ्या अनेक कुटुंबांत गणपतीच्या दिवशी उमा महेश्वराचे पूजन केले जाते. या दोघांचे पूजन केल्याशिवाय गणेश पूजन करायचे नाही अशी प्रथा आहे. महाराष्ट्रात ‘हरतालिका’ तृतीयेच्या दिवशी पूजण्याची प्रथा असली तरी दक्षिण भारतात मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीनं हरतालिकेचं व्रत केलं जातं. हरतालिकेच्या दिवशी सुवर्णगौरी व्रत असते. यात गौरीचा केवळ मुखवट्याची पूजा केली जाते. तर महाराष्ट्रात अनेक गावात समुद्रावरील वाळू किंवा शेतातली माती आणून सखी, पार्वती आणि शिवलिंगाची पूजा करण्याची प्रथा आहे.