मुंबई: भाजीपाला विक्रेत्यांकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जातोय का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. सध्या सोशल मीडियावर भांडूप रेल्वे स्थानकाच्या परिसरातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओत भाजीपाला विक्रेते रस्त्यावरील वाहत्या गढूळ पाण्यात भाजी धुवत असल्याचे दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक गोष्ट म्हणजे या परिसरात रस्त्याखाली शौचालयाचे चेंबर आहे. त्यामुळे या चेंबरमधून निघणारे ड्रेनेजचे पाणीही या गढूळ पाण्यात मिसळते. याच पाण्यात भाजी विक्रेत्यांकडून भाजपाला धुतला जात असल्याचे स्पष्टपणे व्हीडिोत दिसत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा भाजी विक्रेत्यांवर पालिका कारवाई करणार का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. 


काही दिवसांपूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकाच्या परिसरात लिंबू सरबत बनवताना अशुद्ध पाण्याचा वापर केला जात असल्याचा प्रकार उघड झाला होता. यानंतर अनेक रेल्वे स्थानकांवरील स्टॉलवर प्रशासनाने कारवाई केली होती. 


यानंतर काही दिवसांतच पुन्हा एकदा कुर्ला स्थानकातील स्टॉलवर विकण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. कुर्ला स्थानक परिसरातील झोपडपट्टीत अत्यंत गलिच्छ जागेत वडा, समोसा तयार केले जातात आणि तिथून ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या स्टॉलवर आणले जात असल्याच प्रकार आरोग्य विभागाच्या धाडीत समोर आला होता.