प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई :  मुंबईत अनेकजण नाव आणि पैसा कमवण्यासाठी येतात. त्यात प्रत्येकाला योग्य संधी मिळतेच असं नाही. पण काहींचे तारे चमकतात आणि ते रातोरात मालामाल होतात. पण रातोरात पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण वाट चुकतात, कोट्यवधी रुपये कमवतात, पण उरलेलं आयुष्य गुन्हेगार म्हणून तुरुंगात आणि कोर्ट कचेरीच्या फेऱ्या मारण्यात गमावतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत स्वप्न साकार


असाच काहीसा प्रकार मुंबईतील एका फेरीवाल्याच्या बाबतीत घडला आहे. जो रातोरात 10 कोटींचा मालक बनला. संतोष उर्फ बबलू ठाकूर असं या करोडपती आरोपीचं नाव आहे. पण एक दशक पूर्ण झालं तरी कुणाला त्याच्या या कमाई मागचं गुपित काही कळलं नाही.


कोटींचा मालक


मुंबईत १० घरं, दीड किलो सोनं, उत्तरप्रदेशमध्ये ५ एकर जमीन, फिरायला लागत होती लग्झरी कार, आतापर्यंत त्याच्यावर २५ गुन्हे दाखल, पण तो आता मुंबईत जेलमध्ये हवा खातोय. विशेष म्हणजे उत्तर प्रदेशात गावी सुल्तानपूरला तो विमानाने जायचा.


होय, आम्ही बोलतोय, सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या लोकलमधील त्या फेरीवाल्याबद्दल ज्याने आपलं नशीब बदलून टाकलं आणि भल्या भल्यांना जे जमणार नाही ते करुन दाखवलं.
मुंबईच्या लोकलमध्ये दररोज आपल्याला अनेक छोट्या मोठ्या वस्तू  विकणारे फेरीवाले दिसतात.


या फेरीवाल्यांची कमाई काही मोठी नसते असंच अनेकांना वाटतं. पण हा फेरीवाला त्याला अपवाद ठरला आणि त्याने फेरीवाली क्या चीज है हे सगळ्यांना दाखवून दिलं.


पण म्हणतात ना, मेहनतीचा पैसा तो मेहनतीचा आणि चुकीच्या पद्धतीने मिळवलेला पैसा तो चुकीचाच...संतोष कुमार सिंह उर्फ बबलू हा उत्तरप्रदेशातून मुंबई आला. आणि कोटींचा मालक बनला.


आता तुम्ही म्हणाल, फेरिवाल्याने हे कसं केलं. तर या बबलूच्या कमाईची सुरुवात मुंबईच्या लोकलमध्ये झाली. लोकलमध्ये तो ब्लेडची पाकिट विकत होता. त्यानंतर त्याला असं काही सुचलं की , ज्याने त्याचं आयुष्यच बदललं.


कोट्यवधीश ते कैदी 


ब्लेड विकतानाच संतोषने एक टोळी तयार केली. सीएसएमटी ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यानं आपल्या टोळीच्या माध्यमातून रॅकेट चालवलं. ही टोळी स्टेशन आणि गाड्यांमधल्या फेरिवाल्यांकडून खंडणी उकळू लागला. यात त्याच्या पत्नीसह एक मैत्रिण देखील सामील होती.


500 रुपयांपासून ते 5 हजारांपर्यंत खंडणी घेत होता. पैसे दिले नाहीत, तर संतोष आणि त्याचे गुंड मारहाण करायचे. या खंडणीखोरीतून त्यानं तब्बल 10 कोटींची मालमत्ता उभी केली.
पण आता कोट्यावधीश बनण्याचा प्रवास अखेर 15 वर्षांनंतर थांबला आहे.


कारण पोलिसांनी संतोषसह त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून त्याची बेनामी मालमत्ताही जप्त केली आहे. यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी आपली बायको शिकवण्या करते, आपला गारमेंटचा व्यवसाय आहे, अशी बतावणी संतोष करत होता.