मुंबई: राज्यभरात गाजलेल्या सोनई हत्याकांड प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने चार आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तर पुराव्यांअभावी अशोक नवगिरे याची शिक्षा न्यायालयाने रद्द केली. रमेश दरवळे, प्रवीण दरवळे, प्रकाश दरवळे, संदीप कुरे या आरोपींची फाशी कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१३मध्ये अहमदनगरच्या सोनई गावात हे हत्याकांड घडले होते. संदीप राज थनवार, राहुल कंडारे, सचिन घारू या तिघांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. प्रेमप्रकरणातून धुळे जिल्ह्यातील तीन दलित मजूर युवकांची हत्या करून त्यांचे मृतदेहांचे तुकडे करून सेफ्टिक टँकमध्ये टाकण्यात आले होते. या हत्याकांडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते.


यापूर्वी २४ जून २०१८ मध्ये सोनई हत्यांकाडातील आरोपी पोपट करंदलेचा नाशिक कारागृहात मृत्यू झाला होता. पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले यांची मुलगी नेवासे फाटा येथील त्रिमूर्ती शिक्षण संस्थेत शिकत होती. या संस्थेत सचिन सोनलाल धारू सफाई कामगार म्हणून काम करत होता. कॉलेजमध्ये दोघांचे प्रेमसंबंध जुळले. ही गोष्ट समजल्यानंतर पोपट करंदलेने सचिनचा काटा काढण्याचे ठरवले. 


त्यासाठी पोपट करंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, प्रकाश विश्वनाथ दरंदले (चुलते), गणेश ऊर्फ प्रवीण पोपट दरंदले (भाऊ), संदीप माधव कुऱ्हे (मावसभाऊ), त्यांचा नातेवाईक अशोक रोहिदास फलके व अशोक सुधाकर नवगिरे यांनी दरंदले वस्तीवरील संडासचे सेफ्टी टँक दुरुस्तीचा बहाणा करून व वाजवीपेक्षा जास्त मजुरीचे आमिष दाखवून संदीप राजू थनवार, सचिन सोहनलाल घारू व तिलक राजू कंडारे यांना १ जानेवारी २०१३ रोजी बोलावून घेतले. यानंतर दोषींनी संदीप थनवारला सेफ्टी टँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणाऱ्या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून निर्घृणपणे खून केला होता.