निलेश वाघ , झी मिडिया  मनमाड : मुंबईत बसरत असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर झाल्याचा पाहायला मिळत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मनमाड रेल्वे स्थानकातुन मुंबईला जाणाऱ्या राज्यराणी एक्स्प्रेस,पंचवटी एक्स्प्रेस व गोदावरी एक्स्प्रेस या महत्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सर्वामुळे मनमाड ते नाशिक आणि नाशिक ते मुंबई असा  रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलीच हाल झाले आहेत. तर उत्तर भारतातून मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत असल्याने मनमाडसह विविध रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्यात आल्याने अनेक प्रवाशी रेल्वे गाड़ी आणि रेल्वे स्थानकात अडकले आहेत. रेल्वे वाहतूक कधी सुरु होईल ? थांबलेल्या गाड्या पुढे जातील की नाही ? याबाबत रेल्वे प्रशासनाकड़ून कुठलीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.



लोकलवरही परिणाम 


मुसळधार पावसामुळे लोकल सेवेला बेक बसल्याने ठाण्यापुढे लोकल सेवा बंद पडली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची खूपच गर्दी उसळली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाडयाही रद्द करण्यात आल्याने त्या प्रवाश्यांना फटका बसला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर कोणतीच उद्घोषणा होत नसल्याने लांब पल्ल्याचे प्रवाशी खूप वेळ ताटकळत बसले आहेत. मुंबईतील शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केल्याने अनेक प्रवासी माघारी फिरत आहेत.


कुर्ला ते सायन दरम्यान रुळावर पाणी साचल्यामुळे पहाटेपासून लोकल सेवा ठप्प आहे. मात्र काही रेल्वे स्थानकांच्या दरम्यान विशेष लोकल चालविल्या जात आहेत. जागोजागी अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेले आहेत. या विशेष लोकल चालविल्यामुळे या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. काही वेळापूर्वीच कुर्ला ते अंबरनाथ दरम्यान एक विशेष लोकल स्लो डाऊन मार्गावरून चालवण्यात आली.