मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोडकसागर ओव्हरफ्लो झाले आहे. त्यानंतर आता तानसाही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. तानसाठी पातळी 422.78 इतकी आहे. सध्या तानसा 421.76 इतकं भरलं.  तर दुसरीकडे भातसा धरण क्षेत्रातही मोठ्या प्रमाणआत पाऊस पडतोय.


गेल्या 24 तासांत भातसाच्या पाणलोट क्षेत्रात 76 मिमी पावसाची नोंद झालीय.  भातसाची क्षमता 142 मीटर इतकी आहे. भातसा सध्या 131.34 मीटर इतकं भरलंय. 


ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सुरुच आहे. त्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला लागलंय.  कल्याणमधील महत्त्वाच्या शिवाजी चौक, लालचौकी या भागांमध्ये पाणी साचायला सुरूवात झालीय. तर आंबेडकर रोड परिसरातल्या दुकानांमध्येही पाणी शिरायला लागलंय. तर कल्याण पूर्वेतल्या पत्री पूल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. नागरिकांच्या घरांमध्येही पाणी साचायला सुरूवात झालीय. 


गेल्या तीन ते चार दिवसांपासून अंबरनाथ तालुक्यात बरसत असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस झाल्यानं धरणाची पाण्याची पातळीही वाढली आहे. अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणारं चिखलोली धरण १०० टक्के भरून वाहू लागलं आहे. अंबरनाथ पूर्वेतील जवळजवळ दीड ते दोन लाख लोकसंखेला या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या धरणातून ६ एमएलडी पाणी अंबरनाथ शहरासाठी उचलले जातं.