मुसळधार पाऊस, गरज असेल तर बाहेर पडा : मुंबई पालिका
शहरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अति महत्वाचे काम असल्याच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
मुंबई : शहरात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अति महत्वाचे काम असल्याच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत मोठ्या पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या एक तासांत ७० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच सकाळी ८.३० वाजल्यापासून १०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तविलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार पुढील २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरांत मोठ्या पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला आहे.
बृहन्मुंबई महापालिकेचचे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी शहरातील रस्त्यांवर कार्यरत असून परिस्थितीत हाताळत आहेत. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाखाली असून मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पाणी साचण्याच्या ठिकाणी १३६ पंप कार्यरत आहेत व पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. महापालिकेची ६ मोठे पंम्पिंग स्टेशन्सही पूर्ण क्षमतेसह सुरु आहेत.
सद्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हिंदमाता, शिव मार्ग क्रमांक २४ आणि अंधेरी सबवे या ठिकाणची बेस्ट वाहतूक वळविण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रस्त्यांवरील वाहतूक संथगतीने सुरु आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु असून माहीम येथे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प आहे.
नागरिकांना विनंती आहे की, अति महत्त्वाचे काम असल्याच घराबाहेर पडावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.