मुंबई: राज्यात येत्या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याकडून मुंबई, कोकण आणि गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.


बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गेल्या २४ तासांपासून बदलापूरजवळच्या बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे बारवी धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत बारवी धरणक्षेत्रात पाऊणे दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या या बारवी धरणातून औद्योगिक क्षेत्रांसह अनेक पालिका आणि महापालिकांना पाणी पुरवठा केला जातो. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरु असल्यानं, समाधान व्यक्त केलं जात आहे. 


कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी


दुसऱ्या बाजाला, बदलापूर शहरापासून अवघ्या ६ किलोमीटर अंतरावर असलेला कोंडेश्वरचा परिसर आहे. डोंगरकपारीतून वाहणारे झरे, हिरव्यागार वनराजीतून फेसाळत कोसळणारे धबधबे, हिरवी वस्त्रं परिधान केलेली भातशेतीची खाचरं, रिमझिम पावसातील धुक्‍याची दुलई आणि दुसरीकडे ताठ मानेनं डौलात उभी असलेली सह्याद्रीची पर्वतरांग असा नैसर्गिक वारसा दिमाखात मिरवणारा हा परिसर पर्यटकांसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. सध्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आणि या कोंडेश्वर धबधब्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय. 


दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणी शहराला पाणीपुरवठा करणारं वेण्णा लेक पूर्ण क्षमतेनं भरलं....पर्यटकांना बोटींगचा मनमुरादपणे आनंद देणारं धरण भरल्यानं आनंद व्यक्त केला जात आहे.