Mumbai Heavy Rain: मुंबईसह जवळच्या विभागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवार सकाळची सुरुवातच रिमझिम पावसाने झाली. काही वेळासाठी पावसाची जागा वेगवान वाऱ्याने घेतली. यादरम्यान झालेल्या दुर्देवी घटनेमध्ये  एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसामुळे झाड पडून मृत्यू झाल्याची घटना मालाडमधून समोर येत आहे. मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मामलेतेदार वाडी परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. यामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. 


मुंबईच्या उपनगरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तर मुंबईच्या काही भागात जोरदार पाऊस पडताना दिसतोय. या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. 
 
मालाड पश्चिमेच्या मावेलेदारवाडी परिसरातील मणिभाई मुंजी चाळीत 35 फूट ऊंच आणि 4 फूट रुंद पिंपळाचे झाड पडले. सकाळी शौचाला गेलेल्या कौशल यांच्या अंगावर हे झाड कोसळले. पिंपळाचा मोठा भाग अंगावर पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. 


बुधवारी सकाळी गोरेगाव, विलेपार्ले, अंधेरी आणि लोअर परेल या विभागात जोरदार पाऊस पडला. 


भर पावसात मुंबईत पाणी कपात 


मुंबईत (Mumbai) पावसाने (Rain) हजेरी लावली असली तरी धरणक्षेत्रात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नाही. याचा फटका आता मुंबईकरांना बसत असून पाणीकपातीचा (Water Cut) सामना करावा लागणार आहे. धरणक्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे 1 जुलैपासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. यासंबंधी पालिका आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यांनी मंजुरी दिल्यानंतर पाणीकपात लागू केली जाणार आहे. धरणात सध्या फक्त 26 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. 


मुंबई पाणी पुरवठ्यासाठी मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या धरणांवर अवलंबून असते. या धरणांमधून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. पण यावेळी मान्सून लांबल्याचा फटका या धऱणांना बसला आहे. या धरणांमध्ये सध्या फक्त 100873 दशलक्ष लिटर म्हणजे केवळ 6.97 टक्के पाणी शिल्लक आहे. पण मुंबईकरांना वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी धरणात 14 लाख 47  हजार 343 दशलक्ष लिटर पाणीसाठा असणं गरजेचं आहे.