राज्यभरात आठवड्याखेरीज पाऊस पुन्हा सक्रीय
तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यभरात बरसणार आहे.
मुंबई: तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यभरात बरसणार आहे. गुरुवारपासून विदर्भात, तर शुक्रवारपासून मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. शनिवारी संपूर्ण राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पश्चिम किनारपट्टीवर वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने दोन दिवस मुंबईत पर्जन्यवृष्टीत वाढ झाली आहे. राज्याच्या इतर भागात तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ पाऊस नसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सोमवारी मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्य़ात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
आता राज्यात पुन्हा एकदा मोसमी वारे सक्रिय होण्याचा अंदाज आहे. पूर्व किनारपट्टीवरून येत असलेल्या मोसमी वाऱ्यांमुळे पुढील दोन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात पाऊस हजेरी लावेल. गुरुवारपासून विदर्भात पावसाचा जोर वाढेल. त्यानंतर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या मध्यम सरींना सुरुवात होईल.
कोकण, मध्य महाराष्ट्र येथील काही ठिकाणी शुक्रवारी व शनिवारी मुसळधार सरी येतील तर मराठवाडय़ात शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याप्रमाणेच गुजरात व मध्य प्रदेश येथेही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.