येत्या ४८ तासात मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा
अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.
सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : येत्या ४८ तासात मुंबईसह उपनगरात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजरात किनारपट्टी लगत वाऱ्याचा द्रोणीय भाग तयार झाल्याने कोकणासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील अंतर्गत भागात आणि घाट परिसरात पावसाची परिस्थिती अनुकूल नसल्याने पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात पाऊस आहे. नाशिक-नागपूर-पुणे येथे तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मराठवाड्यात, विदर्भात, मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणार असल्याचं देखील हवामान खात्याने म्हटलं आहे.
आज सकाळपासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. याचा फटका मध्य रेल्वेला देखील बसला आहे. विद्याविहार स्थानकावर फलाट क्रमांक एकच्या रुळावर पाणी भरले आहे तर दोनवर काही ठिकाणी पाणी तुंबल्याचं पहायला मिळतं आहे. पाणी साचलं असल्यानं अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.
विक्रोळी कन्नमवार नगर परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण झाली. सोसायट्यांच्या आवारात तसेच रस्त्यांवर पाणीच पाणी साचलेले दिसून येतं आहे.
मुंबई आणि उपनगरात सकाळपासून संततधार सुरू आहे. गेले दोन दिवस मुंबईत पाऊस बरसला नव्हता. मात्र आज पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. साकीनाका, चेंबूर, अंधेरी, घाटकोपर, सायन, कुर्ला इथे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पहायला मिळालं.