मुंबईसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी
मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस
मुंबई : गेल्या २४ तासाच्या कालावधीत संपूर्ण शहरात मध्यम पावसासह मुंबईत एकट्या मुसळधार पावसाची नोंद झाली. काही ठिकाणी तीव्र गडगडाटही ऐकण्यात आले, अशी माहिती हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सून पाऊस मुसळधार कोसळत आहे. मुंबईतही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मुंबई व उपनगरांत गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस पडला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात ३७.४३ मिमी, पश्चिम उपनगरांत ३४.४ मिमी तर पूर्व उपनगरांत ५२.६ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या २४ तासांत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावला.
सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत मुंबईत पावसाची नोंद झाली आहे. चेंबूर येथे ८४ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. पुढील २ दिवस पावसाचा जोर कमी असू शकतो. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाने जोर धरला आहे. मुंबईत गुरुवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु होती. कुर्ला येथे इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही.