मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता, समुद्राला उधाण येणार
पुढील ४८ तासाच जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रामुख्यांने मुंबईत पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
मुंबई : राज्यात पावसाचा म्हणावा तसा जोर दिसून येत नाही. काही जिल्ह्यात चांगला पाऊस पडत असला तरी पावसाची उघडीप दिसून येत आहे. दरम्यान, पुढील ४८ तासाच जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. प्रामुख्यांने मुंबईत पुढील दोन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे.
मुंबईत ३ आणि ४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होईल, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय उत्तर भारतातीलही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकण भागात चांगला पाऊस पडत आहे. मात्र, पावसाची उघडीप आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. दिवसा पासून कमी आणि रात्री पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. आज सकाळपासून कोकणात पावसाला जोर दिसून येत आहे. येत्या ४ जुलै ते २४ जुलै दरम्यानचे आठ दिवस समुद्र खवळेल्या दिसून येईल. या दिवशी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या दिवसांत मुंबईच्या समुद्रात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत.
जुलैमध्ये मुंबईत जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. समुद्राला भरती असताना मुंबईत अतिवृष्टी झाल्यास समुद्रात जाणारं पाणी थांबल्याने ते तुंबण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावे, असे आवाहन मुंबई पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरती आणि जोरदार पाऊस या पार्श्वभूमीवर पालिकेनेही आपली आपत्कालीन यंत्रणा सक्षम केली असून चौपाट्यांसह, दहा केंद्रांवर आवश्यक साधनसामग्रीसह जवान तैनात ठेवले आहेत.