मुंबई : राज्यात मान्सून जोरदार सक्रीय झाला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच संततधार सुरु आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आपला इंगा दाखविण्यास सुरुवात केली आहे. कुर्ला आणि सायन येथे रुळावर पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हार्बर, ट्रान्स हाबर आणि पश्चिम रेल्वे वाहतूक सुरु आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस होत आहे किंग्ज सर्कल परिसरात  पाणी साचले आहे. मुंबईकरांचे सकाळपासूनच हाल होण्यास सुरुवात झाली आहे. मान्सुनने मुंबईला झोडपले आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुंबईकरांची पहिल्याच पावसात कसरत करावी लागत आहे. पहिल्याच पावसात मुंबईत रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल धिम्या गतीनं सुरू तर संततधार पावसाचा वाहतुकीलाही फटका बसला आहे. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.



मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच गडगडाट सुरू झाला आणि मुसळधार पाऊस कोसळण्यास सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवस दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने महानगरपालिका प्रशासनही सज्ज झाले आहे. हवामान खात्याने गेल्या शनिवारीच मान्सून रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहोचल्याचे जाहीर केले होते. आता हा मान्सून मुंबईत दाखल झाला आहे. आज कुलाबा, महालक्ष्मी आणि दादर भागात 20 मि.मी. ते 40 मि.मी. तर उत्तर मुंबईतील चिंचोली, बोरीवली आणि दहिसर भागात दुपारपर्यंत 60 मि.मी. इतका पाऊस नोंदला गेला. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि मराठवाडय़ातील काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला.



मुंबईत आज ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. काल मंगळवारी मान्सूनपूर्व पाऊस होता. आजपासून मान्सून मुंबईत सक्रीय झाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह किनारपट्टी भागात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. कुलाबा वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सांगितले की पाऊस अधिक जोर धरु शकेल. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.