मुंबई : माझं मुंबईकरांना खास आकर्षण आहे. राजकीय आणि सामाजिक नेत्यांचं तर माझ्यावर विशेष प्रेम आहे. अनेक क्रिकेटपटू माझ्या अंगाखांद्यावर खेळून मोठे झाले आहेत. मात्र माझं सर्वाधिक भावनिक नातं जोडलं गेलं ते एका अवलियाशी आणि त्याच्या पक्षाशी...१९२५ साली माझं नाव माहिम पार्क होतं. मात्र १९२७ मध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी माझं शिवाजी पार्क असं बारसं घातलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा उभारला. माझ्या मैदानात स्वातंत्र्यासाठीच्या चळवळी झाल्या आणि अनेक रॅली निघाल्या. तर संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्यासाठीही सामाजिक कार्यकर्ते माझ्याच अंगणात यायचे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९६६ मध्ये एक अवलिया माझ्याकडे आला आणि दसऱ्याला त्यानं एक भव्य सभा इथं घेतली. त्या अवलियाचं भाषण ऐकून मी केवळ प्रवाभितच झालो नाही तर त्यांच्या प्रेमातच पडलो. त्या व्यक्तीचं नाव होतं बाळासाहेब ठाकरे. त्यांचं आणि माझं नातं असं काही जमलं की दरवर्षी ते माझ्याकडे यायचे आणि इथं आपल्या मनातील सारी भडास काढायचे आपल्यातील भावना ते व्यक्त करायचे आणि आपल्या विरोधकांनाही इथूनच आव्हान द्यायचे. त्यांचा तो अवतार.... त्यांचा तो आवेश साऱ्यांनाच भारावून टाकायचा. त्यांची शिवसेना नावाची पार्टी माझ्याच अंगाखांद्यावर वाढली. बाळासाहेबांशी माझं अखेरपर्यंत भावनिक नातं जशाच्या तसं राहिलं. म्हणूनच त्या त्यांचं निधन झालं तरी ते माझ्याच मातीत विलीन झाले. 


आज बाळासाहेबांच्या वारसानं माझ्याच अंगणात आणि आपल्या वडिलांच्या स्मृतीस्थळासमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. आज जर का ते असते तर ते किती आनंदी असते. त्यांनी आपल्या या मैदानात पुन्हा एकदा डरकाळी फोडली असती आणि साऱ्या आसमंतात त्यांची ही डरकाळी दुमदुमली असती. आज त्यांची सारी स्वप्न पूर्ण झाली. आज मलाही त्यांची खूप आठवण येत आहे आणि त्यांच्या आठवणीनं मी खूप व्याकूळ होत आहे. 


- बाळासाहेब ठाकरेंचा प्रिय शिवाजी पार्क