मुंबई : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी श्री सिद्धिविनायक मंदिराकडून 51 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. शिवाय, पुण्यातील जायबंदी जवानांसाठी काम करणाऱ्या क्विन मेरी संस्थेला देखील 25 लाखांचा निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री सिद्धिविनायक संस्थेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी ही माहिती दिली आहे. विश्वस्त मंडळाची तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यात ४४ भारतीय जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून संताप आणि दु:ख व्यक्त होत आहे. पुलवामाच्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभर उमटू लागले आहेत. दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलं. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हल्ल्यानंतर भारतानं दिल्लीतले पाकिस्तानी उच्चायुक्त सोहेल मोहम्मद यांना समन्स बजावला आहे.


भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आता पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी आणि पाकिस्तानची गळचेपी करण्यासाठी भारताकडून पाऊल उचलण्यात येणार आहेत.


गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पुलवामातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. बडगाममध्ये सर्व हुतात्म्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. राजनाथ सिंह यांच्यासह सीआरपीएफचे वरिष्ठ अधिकारी, लष्कराचे उत्तर कमांडचे प्रमुख तसंच विविध लष्करी आणि मुलकी अधिकारी उपस्थित होते. शहिदांना मानवंदना दिल्यानंतर शहिदांचे पार्थिव दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी गृहमंत्र्यांनी स्वतः पार्थिवांना खांदा दिला.