Haffkine Institute मध्ये हेरिटेज वॉक, पर्यटकांना मिळणार 160 वर्षे जुन्या वास्तूला भेट देण्याची संधी
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा, वाचा कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेत भेट देता येणार
मुंबई : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक (High Court Heritage Walk) प्रमाणेच पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट (Haffkine Institute) इथं हेरिटेज वॉक (Heritage Walk) सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आजपासून करण्यात येत आहे. इथल्या वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार आणि रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल, अशी माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.
हेरिटेज वॉकसाठी सामंजस्य करार
जागतिक पर्यटन दिनानिमित्त (World Tourism Day) हेरिटेज वॉक सुरु करण्यासाठी सामंजस्य करार (Memorandum of Understanding) करण्यात आला होता. हेरिटेज चाहत्यांसाठी पहिली हेरिटेज टूर 27 नोव्हेंबर 2022 पासून सुरु करण्यात येत आहे. हा वॉक सकाळी 10, 11 आणि दुपारी 12 वाजून 54 मिनिटांनी करण्यात आली. या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त अभ्यासक आणि पर्यटन प्रेमी याचा लाभ घेतील अशी आशा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केली.
संस्थेला हाफकीन नाव कसं पडलं?
प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणीसाठी हाफकिन संस्था ही भारतातील सर्वात जुन्या बायोमेडिकल संशोधन संस्थांपैकी (Biomedical Research Institutes) एक आहे आणि त्याची स्थापना 1899 मध्ये झाली. प्लेगच्या लसीचा शोध लावणाऱ्या डॉ. वाल्डेमार माईकाय हाफकिनच्या (Dr. Waldemar Michael Haffkin) नावावरून ह्या संस्थेला 'हाफकिन इन्स्टिटयूट" असे नाव देण्यात आले. सांसर्गिक रोगांच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी यामध्ये अग्रेसर असलेली एक बहुविद्याशाखीय संस्था म्हणून ही संस्था विकसित झाली आहे. ही संस्था राज्य आणि केंद्रीय सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणांसोबत काम करते. या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेने प्लेगसाठी संदर्भ प्रयोगशाळा म्हणून काम करण्यासाठी आमंत्रित केलं आहे.\
विज्ञान आणि कलेची सांगड
पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ.बी.एन.पाटील म्हणाले, "या हेरिटेज टूरचा एकमेव उद्देश लोकांना विज्ञान आणि कला यांची सांगड असलेल्या वास्तूचे दर्शन घडवणे हा आहे. इथं लोकांना संस्थेच्या वैभवकालीन दिवसाचं दर्शन घडवणारे व्हिटेज फोटो गॅलरी तसंच बॉम्बे गव्हर्नर यांचे निवासस्थान असलेल्या स्थापत्यकलेच्या उत्कृष्ट इमारतीचे दर्शन घेता येईल. ह्या संस्थेकडे विविध सूक्ष्मजंतूंच्या प्रतिकृति आहेत तसंच प्लेगची लस कशी विकसित झाली ह्याची प्रतिकृति देखील येथे पहायला मिळेल.